मुळा, भंडारदारा पाणलोटात जोरदार पाऊस; कळसूबाईच्या पायथ्याला अडकलेल्या पर्यटकांची सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यात आजही पावसाने जोरदार हजेरी लावली असून, धरणांच्या पाणलोटातही तुफान पाऊस सुरू आहे. पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातही रिमझिम पाऊस सुरू असून, अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून येत आहे.

हवामान खात्याने सलग दोन दिवस वादळी वाऱयासह पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता. नगर जिह्यातील धरण क्षेत्रामध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत आहे. मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोटात सुरू असलेल्या पावसामुळे या धरणांच्या पाणीसाठय़ातही वाढ होत आहे.

हरिश्चंद्रगड, पाचनई व अन्य भागात जोरदार पाऊस कोसळत असल्याने मुळा नदीतील कोतुळ येथील विसर्ग 9155 क्युसेकच्या पुढे गेला आहे. त्यामुळे आज मुळा धरणात नवीन पाण्याची आवक आणखी वाढणार आहे. 26 हजार दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात सध्या पाणीसाठा 9 हजार दलघफूच्या पुढे गेला होता. मुळा पाणलोटात काल सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला. त्यामुळे डोंगरदऱयांमधील पाणी मुळा नदीत येत होते. परिणामी तासागणिक मुळा नदीचा विसर्ग वाढत होता. काल सायंकाळी या नदीतील विसर्ग 8770 होता. तो आज सकाळी 9155 क्युसेकवर गेला होता.

जिह्यात खरीप हंगामासाठी आतापर्यंत जवळपास पावणेदोन लाख हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहे. गुरुवारअखेर हा आकडा 1 लाख 63 हजार हेक्टर होता. पेरणीमध्ये कापूस, सोयाबीनचे क्षेत्र अधिक असून, त्या खालोखाल बाजरी आणि अन्य पिकांचा समावेश आहे. दोन दिवसांपासून जिह्यातील विविध भागात संततधार पावसासारखी स्थिती आहे. शुक्रवारी जिह्यात सर्वाधिक 45 मिलिमीटर पाऊस शेवगावमध्ये नोंदवला गेला. जिह्यात अन्यत्र कमी अधिक प्रमाणात पावसाची चांगली हजेरी आहे.

कोथळे प्रकल्पही ओव्हरफ्लो

मुळा नदीवरील कोथळे प्रकल्प रात्री शनिवारी रात्री 8 वाजता पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला आहे. प्रकल्पाची साठवण क्षमता 182 दलघफू आहे. ओव्हरफ्लो विसर्ग पुढे मुळा नदीमध्ये प्रवाहीत होत आहे. यापूर्वी 600 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या पिंपळगाव खांड धरण अपेक्षेप्रमाणे बुधवारी ओव्हरफ्लो झाले. त्यापूर्वी आंबित बंधाराही ओव्हरफ्लो झालेला आहे.

कुकडीत 1 टीएमसी पाणी नव्याने दाखल

दक्षिण नगर जिह्याची जीवनदायिनी असलेल्या कुकडी समूह पाणलोटातही जोरदार पाऊस होत असल्याने काल सकाळी संपलेल्या 24 तासांत तब्बल 990.44 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. त्यामुळे धरणांतील एकूण उपयुक्त पाणीसाठा 2920 दलघफू झाला आहे. येडगाव 14, माणिकडोह 55, वडज 8, पिंपळगाव जोगे 47, डिंभे 19 मिमी. या पावसामुळे ओढे-नाले सक्रिय असून, धरणात विसावत आहेत. या हंगामात प्रथमच एवढी मोठी पाण्याची आवक झाली आहे. माणिकडोह धरणात 244 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. सर्वाधिक डिंभे धरणात 256 दलघफू पाण्याची आवक झाली. पिंपळगाव जोगेत 475 दलघफू पाणी दाखल झाले आहे.

कळसूबाईच्या पायथ्याला अडकलेल्या पर्यटकांची सुटका

कळसूबाई शिखरावर मुसळधार पाऊस असल्याने या ठिकाणी कृष्णवंती नदीचे उगमस्थान असलेल्या जहागीरदारवाडीत पूर आला होता. तेथील बंधारे आणि पूल वाहून गेल्याने शिखरावर गेलेले हजारो पर्यटक अडकले होते. काही पर्यटकांनी राजूर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत स्थानिकांच्या मदतीने या पर्यटकांची सुखरूप सुटका केली. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस कर्मचारी अशोक गाडे, विजय फटांगरे, राकेश मुळाणे यांच्यासह जहागीरदारवाडीतील ग्रामस्थ, तरुणांनी या बचावकार्यात सहभाग घेतला.