
वाळूतस्करीसाठी मुळा नदीपात्रात अवैधपणे रस्ता तयार करणाऱया दोघांवर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राजू श्रीरंग डोंगरे व अविनाश रोहिदास डोंगरे (रा. जांबूत बुद्रुक, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
संगमनेर तालुक्यातील पठार भागात मुळा नदीपात्रात माती, मुरुमाचा बांध घालून वाळूतस्करी करण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला होता. हा रस्ता संगमनेर तालुक्यातील खैरदरापासून ते पारनेर तालुक्यातील पवळदरा दरम्यान तयार करण्यात आला होता. महसूल विभागाने हा रस्ता जेसीबीच्या साहाय्याने तोडून टाकला. त्यानंतर हा रस्ता तयार करणाऱयांवर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, महसूलच्या स्थानिक अधिकाऱयांकडून वाळूउपशाची दखल घेतली जात नसल्याने तालुक्यातील जांबूत बुद्रुक येथील ग्रामस्थांनी अवैध वाळूउपशाबाबत थेट विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर महसूल विभाग खडबडून जागा झाला.
नांदूर खंदरमाळ गावचे तलाठी युवराजसिंग जारवाल यांनी खैरदरा येथील मुळा नदीपात्रात जाऊन पंचनामा केला व फिर्याद दाखल केली. नदीपात्रामध्ये वाळू, मुरूम टाकून नैसर्गिक नदीपात्रामध्ये भराव तयार करून मुळा नदीपात्राचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश लोंढे तपास करीत आहेत.
























































