
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचा बहुचर्चीत चित्रपट ‘मुल्क’ याच्या कथेवरून सध्या वाद सुरू आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुसलमानांची सहानुभूती मिळवण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न आहे असा आरोप सिन्हा यांच्यावर करण्यात आला. परंतु असा आरोप करणाऱ्यांना सिन्हा यांनी धारेवर धरले असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या ट्रोलरला उत्तर दिले आहे.
चित्रपटामध्ये एका मुसलमान कुटुंबावर देशद्रोही असल्याचा आरोप करण्यात येतो आणि त्यानंतर समाजामध्ये आपले पूर्वीचे स्थान मिळवण्यासाठी काय-काय करावे लागते याचे चित्रण करण्यात आले आहे. यावरून सिन्हा यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले. याला प्रत्युत्तर देताना सिन्हा यांनी ट्विटरवर एक पत्र शेअर केले आहे. ‘मुल्क’ चित्रपटात अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा पैसा लागलेला नाही, वाटलं तर त्याला विचारू शकता. चित्रपटासाठी काँग्रेसचाही पैसा लागलेला नाही, वाटलं तर तुम्ही राहुल गांधी यांना विचारू शकता. तसेच राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचाही पैसा लागलेला नाही, तुम्ही मोहन भागवत यांना विचारू शकता. इतर कोणत्याही हिंदू संघटनेचा पैसा लागलेला नाही, असे सिन्हा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या चित्रपटासाठी दीपक मुकुट आणि त्यांचे वडील कमल मुकुट यांचा पैसा लागलेला आहे आणि ते मोठे उद्योजक आहेत, असे सिन्हा यांनी नमूद केले आहे.
An open letter to all the trolls. Bring it on!!! pic.twitter.com/QSLMOBLmnz
— Anubhav Sinha (@anubhavsinha) July 15, 2018
तसेच ट्रोलर्सच्या पोस्ट वाचून आपल्याला हसून येत असून वाईटही वाटत असल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे. ‘मुल्क’ हा एक अप्रतिम चित्रपट असून याचा हिंदू आणि मुसलमान यांच्याची काहीही संबंध नाही, असेही सिन्हा म्हणाले. दरम्यान, ‘मुल्क’ या चित्रपटामध्ये ऋषि कपूर, तापसी पन्नू, नीना गुप्ता, मनोज पहवा, कुमुद मिश्रा, आशुतोष राणा, प्राची शाह पंड्या, वर्तिका सिंह, अश्रुत जैन आणि इंद्रनील सेनगुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


























































