पालिकेचे आता ‘ऑपरेशन म्युकर मायकोसिस!’

कोरोनाची दुसरी लाटही रोखण्यात यशस्वी ठरल्यानंतर पालिकेने आता धोकादायक ठरणाऱया ‘म्युकर मायकोसिस’ला रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी प्रमुख चारही रुग्णालयांसह सहा जम्बो कोविड सेंटरमध्ये ‘पोस्ट कोविड ओपीडी’ सुरू करण्यात आली आहे. तर लवकरच स्पेशल म्युकर मायकोसिस वॉर्ड आणि ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण व पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी ही माहिती दिली.

कोरोना नियंत्रणात येत असतानाच कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये म्युकर मायकोसिस आजार होण्याचे प्रकार समोर आले आहेत. यामध्ये डोळे, नाक आणि मेंदूवर हल्ला करणाऱया या बुरशीजन्य आजारामुळे जिवालाही धोका असतो. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार होणे गरजेचे असते. मुंबईत सद्यस्थितीत म्युकर मायकोसिसचे 111 रुग्ण पालिकेच्या केईएम, शीव, नायर आणि कूपर रुग्णालयात उपचार घेत आहेत. पालिकेच्या पोस्ट कोविड ओपीडीमध्ये या रुग्णांचे निदान झाल्यानंतर तातडीने आवश्यक उपचार केल्यामुळे सद्यस्थितीत या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर आवश्यक उपचारही सुरू असून त्यांना देखरेखीखाली ठेवले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

कोविड आजारात जास्त प्रमाणात घेतलेली स्टिरॉइड, टोसिलीझुमॅबचा अतिवापर यामुळे या आजाराचा धोका वाढतो. प्रतिकारशक्ती कमी असणाऱयांसह कॅन्सर, किडनी, डायबेटिस, बोन मॅरो डिप्रेशन, थॅलेसेमिया असे आजार असणाऱयांना या आजाराचा धोका जास्त असतो. प्रसंगी ऑपरेशन करावे लागते. त्यामुळे कोणतीही लक्षणे दिसल्यास संबंधितांनी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. जेणेकरून जिवाचा धोका टाळता येईल. – डॉ. रमेश भारमल, संचालक, वैद्यकीय शिक्षण, प्रमुख रुग्णालये

पालिकेने मागवली महागडी औषधे

म्युकर मायकोसिसवर इंजेक्शन एम्पफोरिसिन-बी लॅपोझोम आणि टॅबलेट पोसोकोनेझोल प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे रुग्णांसाठी पालिकेने 1 लाख 89 हजार एम्पह्टेरिसिन-बी लॅपोझोम इंजेक्शन आणि आणि टॅबलेट पोसोकोनेझोल 38 हजार इतक्या प्रमाणात मागवल्या आहेत. यासाठी पालिकेने निविदाही काढल्या आहेत. पाच ते दहा हजारांपर्यंत किंमत असणारी महागडी इंजेक्शन, गोळ्या पालिकेच्या रुग्णालयांत रुग्णांना मोफत दिली जाणार आहेत.

अशी आहेत लक्षणे

डोळे चुरचुरणे-दुखणे, लाल होणे, स्राव येणे, दृष्टी कमी होणे, नाकातून दुर्गंधी येणारा स्राव येणे, नाक दुखणे, श्वास घेण्यास त्रास, बुरशीजन्य काळा स्राव वाहणे अशा लक्षणांनंतर हा आजार मेंदूवरही आघात करतो.

आपली प्रतिक्रिया द्या