कोरोना काळातही ‘पिचकारी बहाद्दरांचा’ उच्छाद! वर्षभरात 13 हजार जणांवर कारवाई

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे कोरोनासह अनेक संसर्गजन्य आजारांच्या प्रसाराला कारणीभूत ठरत असताना गेल्या वर्षभराच्या कोरोना काळातही मुंबईत ‘पिचकारी बहाद्दरांचा’ उच्छाद कायम आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार नागरिकांवर पालिकेने धडक कारवाई करताना 13 हजार 430 जणांवर कारवाई करून प्रत्येकी 200 याप्रमाणे 26 लाख 56 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे कोरोनासह अनेक संसर्गजन्य आजारांसाठी निमंत्रण ठरते. कोरोनासारख्या विषाणूजन्य आजारामध्ये हा धोका आणखी वाढला आहे. त्यामुळे पालिकेने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱयांवर कारवाई करण्यासाठी मार्शलच्या माध्यमातून जोरदार कारवाई सुरू केले आहे. या कामात पोलिसांचीही मदत घेतली जात आहे. विविध माध्यमांतून जनजागृतीही केली जात आहे. मात्र अजूनही अनेकजण बेजबाबदारपणे सार्वजनिक ठिकाणी थुंकत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास सध्या 200 रुपये असणारा दंड 1200 रुपये करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून 200 रुपयांचा दंड 1200 रुपये करण्यासाठी पालिका आयुक्तांकडे प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. याला आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर महापालिकेची मंजुरी आणि नंतर राज्याच्या नगरविकास विभागाच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी होणार आहे.

मास्कशिवाय फिरणारे 26 लाख 87 हजार!

कोरोना रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा मास्क सार्वजनिक ठिकाणी वापरावा असे अनिवार्य करण्यात आले असताना अनेकजण अजूनही मास्क न घालता बिनधास्तपणे फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱया नागरिकांवर पालिकेचे क्लिनअप मार्शल, पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात 26 लाख 87 हजार 339 नागरिकांवर कारवाई करून 54 कोटी 13 लाख 59 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

अशी झाली कारवाई

  • या कारवाईत पालिकेने आतापर्यंत 23 लाख 50 हजार 159 नागरिकांवर कारवाई केली आहे. या कारवाईमधून 47 कोटी 36 लाख 62 हजार 800 रुपये इतका दंड वसूल केला आहे.
  • तर मुंबई पोलिसांनी 3 लाख 13 हजार 289 जणांवर कारवाई करीत 6 कोटी 26 लाख 57 हजार 800 रुपये इतका दंड वसूल केला आहे. पोलिसांनी जो दंड वसूल केला आहे त्यापैकी 50 टक्के दंड पोलीस विभागाला तर 50 टक्के दंड महापालिकेला दिला जाणार आहे.
  • फेब्रुवारीपासून मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वमधून विनामास्क प्रवास करणाऱया 23 हजार 891 प्रवाशांवर कारवाई करत 50 लाख 39 हजार 200 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
आपली प्रतिक्रिया द्या