बुकिंग केल्यावरच मुंबादेवीचे दर्शन घेता येणार, दर्शनाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना नियंत्रणात आल्यामुळे गुरुवार, 7 ऑक्टोबरपासून राज्यभरातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असून मुंबादेवीचे दर्शन घेण्यासाठी आधी बुकिंग करावे लागणार आहे. बुकिंग केल्यानंतर भाविकांना एसएमएस येईल. त्यात दर्शनाचा दिवस आणि वेळ कळवण्यात येणार आहे. त्यानुसार भाविकांनी येऊन दर्शन घ्यावे, असे आवाहन मुंबादेवी मंदिर प्रशासनाने केले आहे, मात्र मुले, वृद्ध आणि गर्भवतींना दर्शन घेण्यास तूर्तास बंदी कायम ठेवली आहे. दर्शनाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी आहे.

कोरोनामुळे बंद ठेवण्यात आलेली धार्मिक स्थळे गुरुवार, 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून यात जगप्रसिद्ध मुंबादेवी मंदिराचाही समावेश आहे. कोरोना नियंत्रणात असला तरी तो अजूनही पूर्ण संपलेला नाही. त्यामुळे राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने लागू केलेल्या नियमांचे पालन करत सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे उघडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर, मुंबादेवी मंदिर प्रशासनाच्या वतीने सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरण आणि थर्मल तपासणी केली जाणार आहे. भाविकांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. सर्वच भाविकांना देवीच्या दर्शनाची उत्सुकता आहे. त्यामुळे मंदिराबाहेर गर्दी होण्याची शक्यता आहे. मंदिर प्रशासनाने पोलिसांबरोबर चर्चा केल्यानंतर दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार www.mumbadevi.org.in या वेबसाईटवर बुकिंग करूनच दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी दिली.

इतर नियम

  • ज्या भाविकांनी कोरोनाचे दोन डोस घेतले आहेत आणि दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवस झाले आहेत, अशाच भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे.
  • नुकतीच केलेली आरटी-पीसीआर आणि अँटिजेन चाचणीचा अहवाल असणे आवश्यक आहे.
  • 10 वर्षांपर्यंतची मुले, 65 वर्षांच्या पुढील ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवतींना प्रवेश दिला जाणार नाही.
  • मंदिरात हार, फुले, प्रसाद भक्तांकडून स्वीकारला जाणार नाही आणि मंदिरांकडूनदेखील प्रसाद दिला जाणार नाही.