
भातसा जल विद्युत केंद्रात झालेल्या बिघाडामुळे मुंबईत सुरू असलेली 15 टक्के पाणीकपात अखेर रद्द करण्यात आली असून मुंबईत पाणी पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे. तरीदेखील भातसा जल विद्युत केंद्रात पाणी शिरल्यामुळे निर्माण झालेल्या बिघाडाची दुरुस्ती अजूनही सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रात पाणी घुसल्याने झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईत 27 फेब्रुवारीपासून 15 टक्के पाणीकपात सुरू करण्यात आली होती. मात्र सद्यस्थितीत या विद्युत केंद्रात झालेल्या बिघाडाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. परंतु भातसा धरणातून दोन हजार दशलक्ष लिटर पर्यायी पाणी उपलब्ध झाल्याने मुंबईकरांवरील 15 टक्के पाणीकपात रद्द करण्यात आल्याचे पालिकेच्या जल विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, विद्युत केंद्रात 15 मीटरमध्ये बिघाड झाल्याने दुरुस्तीत तांत्रिक अडचणी येत आहेत; परंतु मुंबईला सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करण्यात झाल्याने पाणीकपात टळली आहे. मात्र दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास अजून काही दिवस लागणार आहेत.


























































