
मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसेसच्या अधिकाधिक मार्गांवर प्रदूषणमुक्त आणि वातानूकूलित प्रवासाची अनुभूती घेता येणार आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात मंगळवारी 157 इलेक्ट्रिक एसी बसेस दाखल झाल्या. संपूर्ण सार्वजनिक वाहतूक प्रदूषणमुक्त केली पाहिजे. त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. बेस्टला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सरकार मदत करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
कुलाबा बस आगार येथे बेस्टच्या पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक एसी बसगाडय़ांचा लोकार्पण सोहळा पार पडला. काही दिवसांपूर्वीच शहरातील विविध बस आगारांमध्ये ‘पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स’ आणि ओलेक्ट्रा कंपनीच्या इलेक्ट्रिक एसी बसेस दाखल झाल्या होत्या. त्या बसेसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतील संपूर्ण सार्वजनिक परिवहन सेवा प्रदूषणमुक्त करण्यावर भर देणार असल्याचे जाहीर केले. मुंबईकरांना अधिक सोयीच्या गाडय़ा दिल्या पाहिजेत. तसेच शहरातील प्रदूषण कमी केले पाहिजे, या दृष्टिकोनातून 5000 बसेस दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्या बसेस टप्प्याटप्याने दाखल होत आहेत. बससेवा बळकट करण्यासाठी, बेस्टला मजबूत करण्यासाठी पालिकेने निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
‘नॉन फेअर बॉक्स’ महसूल वाढवण्याची बेस्टला सूचना
बस लोकार्पण सोहळय़ात मुख्यमंत्री फडणवीस यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांना ‘नॉन फेअर बॉक्स’च्या महसुलासंदर्भात सूचना केली. जोपर्यंत 40 टक्के महसूल ‘नॉन फेअर बॉक्स’ होत नाही, तोपर्यंत कोणतीही परिवहन सेवा वा सिटी बस फायद्यात येऊ शकत नाही. मुंबईसारख्या शहरात खूप मोठी संधी आहे. ‘नॉन फेअर बॉक्स’ महसूल वाढवण्याच्या दृष्टीने बेस्ट उपक्रमाने प्रयत्न करावेत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले.
बसेसची वैशिष्टय़े
n 12 मीटर लांबीच्या संपूर्णपणे इलेक्ट्रिक बसगाडय़ा ओशिवरा आगारातून 82, आणिक आगारातून 33, कुर्ला आगारातून 11 आणि गोराई आगारातून 24 बसगाडय़ा चालवण्यात येणार आहेत. ईव्ही ट्रान्स महाराष्ट्र प्रा. लि. या ऑपरेटमार्फत चालवल्या जाणार आहेत. n शहरातील विविध 21 मार्गांवर नवीन बसेस मुंबईकरांना सेवेत असतील. ही बससेवा अंधेरी (पश्चिम), जोगेश्वरी (पश्चिम), कुर्ला (पूर्व व पश्चिम), वांद्रे (पश्चिम), कांदिवली (पश्चिम) आणि बोरिवली (पश्चिम) या उपनगरी रेल्वे स्थानकांना जोडण्यात येणार आहे. n मेट्रो मार्गिका 1, 2 ए, 7 आणि 3 या मार्गिकांशी नवीन बसेसची सेवा उपलब्ध केली जाणार आहे.






























































