
‘बेस्ट’चे तिकीट किमान पाच रुपये करण्याचा निर्णय 7 जुलैपासून राबवण्यास सुरुवात झाल्यानंतर प्रवाशांची संख्या प्रतिदिन 22 लाखांवरून 32 लाखांवर गेली आहे. या वाढत्या प्रवाशांचा प्रवास गारेगार आणि सुखकर करण्यासाठी लवकरच 300 वातानुकूलित इलेक्ट्रिक बस आणल्या जाणार आहेत. यामध्ये 140 मोठय़ा बस तर 160 मिडी बस आणल्या जातील.
‘बेस्ट’च्या ताफ्यात स्वतःच्या 3100 गाडय़ा आहेत तर नवीन 25 हायब्रिड वातानुकूलित बस आहेत. शिवाय 220 मिडी वातानुकूलित बसदेखील सुरू आहेत. दरम्यान, प्रवाशांची वाढती संख्या पाहता गाडय़ांची संख्याही वाढवली जाणार आहे. यामध्ये गाडय़ांची संख्या दहा हजार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या सगळय़ा बस इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित राहणार आहेत. वाताकरणातील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने क इंधन तेलावरील परकीय चलन वाचकण्यासाठी इलेक्ट्रिक बस आणल्या जाणार आहेत. इलेक्ट्रिक बस गाडय़ांना केंद्र सरकारकडून सबसिडीही मिळणार आहे. लवकरच याबाबतचा प्रस्ताव ‘बेस्ट’ समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे. दरम्यान, वातानुकूलित आणि इलेक्ट्रिक बसमुळे प्रवाशांना गारेगार आणि दर्जेदार सुविधा मिळणार असल्याचे ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी सांगितले.
1,359 कोटींचा खर्च
मोठय़ा बस गाड्यांसाठी ‘बेस्ट’ दहा कर्षांसाठी 662 कोटी 34 लाख रुपये खर्च करणार असून 160 मिडी बस गाडय़ांसाठी दहा वर्षांसाठी 596 कोटी 73 लाख 60 हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. दोन्ही प्रकारच्या बससाठी ‘बेस्ट’ दहा वर्षांत 1,359 कोटी 7 लाख 60 हजार रुपये एकूण खर्च करणार आहे. या बस गाडय़ा पुढील सहा महिन्यांत ‘बेस्ट’च्या ताफ्यात दाखल होतील.
असा राबवणार उपक्रम
- ‘बेस्ट’च्या ताफ्यात 46 इलेक्ट्रिक बस गाडय़ा आहेत तर फेम-2 योजनेतून ‘बेस्ट’ने 140 एकमजली वातानुकूलित क 160 मिडी वातानुकूलित बस गाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे.
- टाटा मोटर्सकडून या बस गाडय़ा घेतल्या जाणार असून 140 वातानुकूलित मोठय़ा बससाठी 83 रुपये प्रति किमी खर्च केला जाणार आहे तर 160 मिडी बस गाडय़ा 74 रुपये प्रति किमी भाडय़ाने घेतल्या जाणार आहेत.































































