
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईरांना 80 इलेक्ट्रिक बसेससाठी केंद्राच्या योजनेची सबसिडी घेण्यास हायकोर्टाने मंजुरी दिली आहे. यंदा सबसिडी लॅप्स होण्याची शक्यता होती म्हणून बेस्ट प्रशासनाने परवानगी मागितल्याने बसेस खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यातील अडसर दूर झाल्याचे बेस्ट समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत उघडकीस आले. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास प्रदूषणमुक्त होणार असून इंधनावरील बेस्टच्या खर्चातही घसघशीत बचत होणार आहे.
केंद्र सरकारच्या योजनेतून इलेक्ट्रिक बसेससाठी मिळणारी सबसिडी वाया जाणार होती. आचारसंहितेपायी हा करार पुढे ढकलल्यास केंद्राचे 54 कोटींचे अनुदान लॅप्स होणार असल्याने बेस्ट प्रशासनाने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. बेस्टने अनुदान घेतले नाही तर ते लॅप्स होणार असल्याने खरेदी करार पुढे चालू ठेवण्याची विशेष परवानगी मागण्यात आल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी समितीच्या बैठकीत सांगितले.
केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या ‘फेमा’ योजनेंतर्गत इको फ्रेंडली गाडय़ांसाठी 54 कोटींची सबसिडी मिळणार आहे. 60 टक्के बेस्टची मालकी आणि 40 टक्के खासगी सहभागातून ही योजना आकारास येणार आहे. बसचा चालक आणि देखभालीची जबाबदारी कंपनीवरच सोपविण्यात आली आहे. कंडक्टर बेस्टचा असणार आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता अशा महानगरांना अशा पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेस देण्यात येत आहेत.
बेस्ट इलेक्ट्रिक बस योजना
60 आणि 40 टक्के मालकी तत्त्व
बसची लांबी 9 मीटर असणार
40 बस एसी तर 40 नॉन एसी
54 कोटींची केंद्राची सबसिडी
ड्रायव्हर कंपनीचा, कंडक्टर बेस्टचा




























































