
ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने माहीम येथील घरी निधन झाले. त्या 89 वर्षांच्या होत्या. गेली सहा दशके नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते. ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या रेखा कामत यांनी मोजक्याच चित्रपटांत काम केले. रंगभूमीवरही अभिनयाची छाप सोडली. चित्रपट आणि मालिकांमध्ये प्रेमळ आजी बनून त्या घरोघरी पोहोचल्या. त्यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत.
रेखा कामत यांचे माहेरचे नाव कुमुद सुखटणकर. कुमुद आणि त्यांची धाकटी बहीण कुसुम यांना लहानपणापासून नृत्य आणि गायनाची आवड. दोघींनी नृत्यगुरू पार्वतीकुमार यांच्याकडून शास्त्राrय नृत्याचे धडे गिरवले. सचिनशंकर यांच्या ‘रामलीला’ या नृत्यनाटिकेत पहिला ब्रेक मिळाला. 1952 मध्ये प्रदर्शित झालेला ‘लाखाची गोष्ट’ हा रेखा यांचा पहिला चित्रपट. त्यात चित्रा यांनीसुद्धा काम केले होते.‘गदिमां’नी कुमुद यांचे ‘रेखा’ आणि कुसुम यांचे ‘चित्रा’ असे नामकरण केले होते. प्रसिद्ध संवाद लेखक ग. रा. कामत यांच्याशी रेखा विवाहबद्ध झाल्या. ‘कुबेराचे धन’, ‘गंगेत घोडे न्हाले’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘अग्गंबाई अरेच्चा’, ‘गृहदेवता’, ‘पोरबाजार’, ‘आजी’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट. चित्रपट महामंडळातर्फे त्यांना ‘चित्रभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
रंगभूमीही गाजवली
रेखा यांनी ‘सौभद्र’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘संशयकल्लोळ’ आदी संगीत नाटकांसह ‘दिल्या घरी तू सुखी राहा’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘कालचक्र’ अशा व्यावसायिक नाटकांतून अभिनयाचा ठसा उमटवला. विजया मेहता दिग्दर्शित ‘यातनाघर’ तसेच अमोल पालेकर दिग्दर्शित ‘पार्टी’ या प्रायोगिक नाटकातही काम केले. याशिवाय ‘प्रपंच’, ‘माणूस’, ‘याला जीवन ऐसे नाव’, ‘सांजसावल्या’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.


























































