देशात समान अभ्यासक्रम लागू झाल्यानंतरच इंजिनीयरिंगसाठी एकच प्रवेश परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

मेडिकल प्रवेशासाठी देशव्यापी ‘नीट’ परीक्षा घेतली जाते. तशीच परीक्षा अभियांत्रिकी (इंजिनीयरिंग) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीही घेण्यात यावी अशी मागणी होत आहे. पण सर्व राज्यांमध्ये इंजिनीयरिंगचा समान अभ्यासक्रम लागू झाल्यानंतरच ते शक्य होईल असे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) स्पष्ट केले आहे.

एआयसीटीईने दोन वर्षांपूर्वीच इंजिनीयरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एकच सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचे ठरवले होते, परंतु देशातील प्रत्येक राज्यामध्ये इंजिनीयरिंगचा अभ्यासक्रम वेगवेगळा असल्याने ते शक्य झाले नव्हते अशी माहिती एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी दिली. सर्व राज्यांमध्ये इंजिनीयरिंगचा अभ्यासक्रम समान होईल त्याच वेळी प्रवेशासाठी एकच सीईटी घेता येईल असे त्यांनी सांगितले.इंजिनीयरिंगच्या जागा कमी झाल्यामागचे कारण त्यांना विचारण्यात आले. त्यावर गेल्या तीन वर्षांत 90 महाविद्यालये बंद झाल्याने तिथे एकही प्रवेश झालेला नाही असे त्यांनी सांगितले. 2015-16 मध्ये इंजिनीयरिंगच्या 16.50 लाख जागा होत्या. त्या यंदा 14 लाख झाल्या आहेत.