Iran-US-Israel War – मुंबई विमानतळावर आज ६६ उड्डाणे रद्द, प्रवाशांचे प्रचंड हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य-पूर्वेतील बिघडलेल्या परिस्थितीचा मोठा फटका मुंबईतील विमान वाहतुकीला बसला असून आज, ८ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील तब्बल ६६ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये येणाऱ्या ३२ आणि मुंबईहून रवाना होणाऱ्या ३४ विमानांचा समावेश आहे.

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हवाई क्षेत्र अंशतः बंद करण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. यापूर्वी ३ मार्च रोजी १०७ उड्डाणे रद्द झाली होती, त्यानंतर आज पुन्हा मोठ्या प्रमाणात विमान सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

या विमान गोंधळामुळे शेकडो प्रवासी मुंबई विमानतळावर अडकून पडले आहेत. अनेक प्रवाशांनी विमानतळ प्रशासनाकडून पुरेशा सोयी-सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या असून, दुबई आणि मस्कत सारख्या शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांना रात्रभर विमानतळावरच थांबून वेळ काढावा लागला. उमराहसाठी जाणाऱ्या प्रवाशांनीही त्यांचे विमान लांबणीवर पडल्याने संताप व्यक्त केला आहे. खाण्यापिण्याची आणि निवासाची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे महिला आणि लहान मुलांचे विशेष हाल होत आहेत.