मुंबई आणि ठाण्याला पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

हवामान विभागाने सोमवारी मुंबई आणि ठाण्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील चार दिवस मुंबई आणि ठाणेकरांना भीषण उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. याखेरीज आर्द्रता वाढण्याचा आणि उष्ण वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

या उष्णतेपासून वाचण्यासाठी हवामान विभागाने काही खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील चार दिवसांसाठी मुंबई-ठाण्यात तापमान 35 अंश सेल्सिअस किंवा अधिक राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामान असू शकतं. त्यामुळे वातावरणातील आर्द्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्द्रतेमुळे उष्ण वारेही वाहू शकतात. त्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता आहे. पश्चिमी वारे वाहणार असल्याने मुंबईच्या तापमानात वाढ होणार आहे.

त्यामुळे पुढील चार दिवसांत शक्यतो दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं, पूर्ण बाह्यांचे, अंग झाकतील असे कपडे परिधान करावेत, तसंच उन्हात बाहेर पडण्याचा नाईलाज असेल तर गॉगल किंवा छत्री वापरावी. तसंच, चेहरा, डोकं बांधून बाहेर पडावं. शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य ठेवा. त्यासाठी वेळोवेळी पाणी, फळांचे रस यांचं सेवन करत राहा, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.