अनुपम खेर यांच्या आत्मकथेत महेश भट्ट यांना मानाचे स्थान

सामना प्रतिनिधी। मुंबई

अनुपम खेर यांनी करीयरमधून आपण काय शिकलो हे आपल्या ‘लेसन्स लाइफ टॉट मी अननोइंगली’ या आत्मकथेत लिहिले आहे. त्यांचे हे पुस्तक 5 ऑगस्टला विक्रीला उपलब्ध होणार आहे. या पुस्तकात त्यांनी आपल्या पहिल्या ‘सारांश’ या सिनेमाचे दिग्दर्शक महेश भट्ट यांना मानाचे स्थान दिले आहे.

शनिवारीच खेर यांनी ट्विटरवर याबाबत खुलासा केला होता. ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘माझ्या आयुष्यात दिग्दर्शक महेश भट्ट यांचे मोठे मानाचे स्थान आहे.’

अनुपम खेर यांची ही आत्मकथा पेंग्विन रॅण्डम हाऊसद्वारे प्रकाशित करण्यात येतेय. ‘530 चित्रपट, 100 हून अधिक नाटके आणि अनेक टीव्ही मालिका अनुपम खेर यांच्या नावावर आहेत. त्यांना दोनदा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, तर त्यांच्या नावावर 8 फिल्मफेअर, बाफ्ता नामांकन, पद्मश्री आणि पद्मभूषण अशा अनेक मानाच्या पुरस्कारांचा, खिताबांचा समावेश आहे. ‘सिल्व्हर लायनिंग्स प्लेबुक’, ‘हॉटेल मुंबई’, ‘दी बिग सिक’, ‘दी फॅमिली मॅन’ अशा काही हॉलीवूडपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप टाकणाऱया 64 वर्षीय अनुपम खेर यांच्या पुस्तकातून आणखी काय काय उघड होईल ते लवकरच कळणार आहे.