ज्योतिषांचे होरे चुकले, सट्टेबाजही फेल, अरविंद सावंत यांचा दणदणीत विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्रिमंडळात अरविंद सावंत यांची वर्णी लागणार

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईतील शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीच्या इतर जागा लागू शकतात, पण दक्षिण मुंबईची सीट धोक्यात आहे. मतदानापूर्वी विरोधकांनी असेच वातावरण निर्माण केले होते. पण विरोधकांची कारस्थाने अपयशी ठरली. ज्योतिषांचे होरे चुकले, सट्टेबाजांचे अंदाज फेल गेले. महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत यांनी लाखांचे मताधिक्य घेत काँग्रेस आघाडीचे उमेदवार मिलिंद देवरा यांना धूळ चारली. सुज्ञ मतदारांनी जनसामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणाऱया आणि ते सोडवण्यासाठी जिवाचे रान करणाऱया शिवसेनेचा ‘आपला माणूस’ पुन्हा एकदा दिल्लीत पाठवला. महायुतीचा उमेदवार सलग दुसऱयांदा लाखाच्या मताधिक्याने निवडून आल्याने दक्षिण मुंबईत जल्लोषाचे वातावरण आहे.

दक्षिण मुंबईत काँग्रेसने मिलिंद देवरा यांना निवडून आणण्यासाठी मुंबईतल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची फौजच कामाला लावली होती. पण निष्ठावान शिवसैनिकांनी अहोरात्र घेतलेली मेहनत, दक्षिण मुंबईतील नागरिकांचे शिवसेनेवर असलेले अतोनात प्रेम यापुढे ती कुचकामी ठरली. देवरा यांनी विजयासाठी बरीच कारस्थाने केली. शिवसेनेची बदनामी केली. जैन धर्मीयांबद्दल वादग्रस्त विधाने केली. गिरणी कामगारांना शिवसेनेविरोधात भडकावण्याचा प्रयत्न केला, पण मतदारांनी मतपेटीतून महायुतीच्या बाजूनेच कौल देत देवरा यांना तोंडघशी पाडले.

15 हजारांवर ‘नोटा’, 188 मते बाद

दक्षिण मुंबईतील 15 हजार 115 मतदार हे निष्पक्ष राहिले. त्यांनी एकाही उमेदवाराला मत दिले नाही म्हणजेच ‘नोटा’ मतदान केले. त्यातील सुमारे दहा हजार मते ही वरळी, शिवडी आणि मलबार हिल विधानसभा मतदारसंघांतील होती. 2298 पोस्टल मते आली. त्यामधील सर्वाधिक 1407 मते महायुतीचे उमेदवार सावंत यांना मिळाली, तर 188 पोस्टल मते ही बाद ठरली.

2014 च्या तुलनेत मतांमध्ये वाढ
2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अरविंद सावंत यांना 3,74,609 इतकी मते मिळाली होती आणि 1 लाख 28 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. यावेळी त्यांच्या मतांमध्ये वाढ झाली. त्यांना 4,20,530 मते मिळाली, पण मताधिक्य एक लाखावर आले. सावंत आणि देवरा वगळता अन्य 11 उमेदवारांनी या मतदारसंघात एकूण 42,689 मते मिळवली.

वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर निष्प्रभ
काँग्रेसची पारंपरिक दलित आणि मुस्लिम मते एमआयएमशी हातमिळवणी करून बनवल्या गेलेल्या वंचित बहुजन आघाडीमुळे विभागली जातील आणि त्याचा फायदा महायुतीला होईल असाही कयास लावला गेला होता, पण वंचित बहुजन आघाडीला मिळालेली 29,990 मते अरविंद सावंत यांच्या 1 लाख 67 इतक्या मताधिक्यातून वजा केली तरी ते 70 हजार मतांच्या आघाडीने विजयी झाले असते. त्यामुळे वंचित आघाडीचा फॅक्टर महायुतीला फायदेशीर ठरण्यापेक्षा काँग्रेसला थोडा मारक ठरला असे म्हणता येईल.

शिवडी, मलबार हिलमधून महायुतीवर मतांचा पाऊस

शिवडी आणि मलबार हिल मतदारसंघातून महायुतीवर मतांचा पाऊस पडला. या दोन मतदारसंघांमधील मतांचा अरविंद सावंत यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा ठरला. शिवसेनेचा बालेकिल्ला आणि गिरणी कामगारांची लोकसंख्या अधिक असलेल्या शिवडीमध्ये महायुतीला 91,497 मते मिळाली. मलबार हिलमधील उच्चभ्रू वसाहतींमधील गुजराती-मारवाडी-जैन बांधवांनी 99,269 मते महायुतीच्या पारडय़ात टाकली. वरळीमध्येही 78,633 मते सावंत यांना मिळाली.

table