मुंबई डावाने जिंकणार हे निश्चित होते आणि तसेच झाले. मुंबईने रॉयस्टन डायसच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर बिहारचा दुसरा डावही 100 धावांवर गुंडाळला आणि रणजी करंडकाच्या पहिल्याच सामन्यात एक डाव आणि 51 धावांनी विजय मिळवत आपल्या मोसमाची दणदणीत सुरुवात केली. तसेच चंदिगड, गुजरात, त्रिपुरा, बडोदा, पुदुच्चेरी, विदर्भ, कर्नाटक यांनीही मोठय़ा विजयासह आपल्या मोसमाचा श्रीगणेशा केला.
मुंबईला बिहारने 251 धावांत रोखल्यावर बिहारच्या संघात आनंदाचे वातावरण होते, पण ते वातावरण फार काळ राहिले नाही. मुंबईने मोहित अवस्थीच्या भेदक माऱयामुळे बिहारचा डाव 100 धावांतच संपवीत त्यांच्यावर फॉलोऑन लादला होता आणि काल दुसऱया डावातही त्यांची 6 बाद 91 अशी दुर्दशा केली होती. आज त्यांना डावाचा मारा टाळण्यासाठी 62 धावांची गरज होती, पण ते धावसंख्येत केवळ 9 धावाच जोडू शकले. कालच्या धावसंख्येत एकाही धावेची भर न घालताच बिपिन सौरभला (30) मोहित अवस्थीने पायचीत केले.
रॉयस्टन डायसची हॅट्ट्रिक
दिवसाच्या दुसऱयाच चेंडूवर बिहारचा विकेट गेल्यानंतर डावात एकही विकेट न घेतलेल्या रॉय डायसने कमाल केली. त्याने आपल्या पहिल्याच षटकाच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर आशुतोष अमन आणि हिमांशू सिंहला बाद केले तर पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर वीरप्रताप सिंहचा त्रिफळा उडवत आपली पहिलीवहिली हॅट्ट्रिक साजरी केली. बिहारचा आजचा खेळ अवघ्या 19 चेंडूंत 9 धावा काढत संपला. डायसने 35 धावांत 3 तर शिवम दुबेने 10 धावांत 4 विकेट टिपले.
दिल्लीवर पुदुच्चेरीची चढाई
पुदुच्चेरीने दिल्लीला त्यांच्याच घरच्या मैदानात हरवण्याचा पराक्रम केला. पुदुच्चेरीने 96 धावांची आघाडी घेतल्यानंतर अबीन मॅथ्यूने 39 धावांत 5 विकेट घेत दिल्लीचा दुसरा डाव 145 धावांवर संपुष्टात आणत आपला विजय निश्चित केला होता. त्यांना केवळ 50 धावा करायच्या होत्या तर पुदुच्चेरीने आकाश कार्गवेचा विकेट गमावत विजयी लक्ष्य 14 व्या षटकांतच गाठत 9 विकेटस्नी जोरदार विजय नोंदविला.
चंदिगड, गुजरातचे मोठे विजय
चंदिगडने आसामवर फॉलोऑन लादल्यानंतर त्यांचा दुसरा डाव 254 धावांवर संपवला. त्यामुळे चंदिगडला केवळ 87 धावा करायच्या होत्या आणि ते बिनबादच गाठले आणि दहा विकेटस्नी विजय मिळविला. गुजरातनेही तीळनाडूसमोर 299 धावांचे आव्हान दिले होते, पण तामीळनाडूचा संघ 187 धावांवरच आटोपला आणि गुजरातने 111 धावांचा विजय मिळविला. त्रिपुराने गोव्यापुढे 501 धावांचे अवघड आव्हान ठेवले होते, पण कृष्णमूर्ती सिद्धार्थच्या 151 धावांच्या झुंझार खेळीनंतरही गोव्याचा डाव 263 धावांवर आटोपला. त्रिपुराने 237 धावांचा मोठा विजय मिळवला.