IPL 2020 – मुंबईची पहिल्या स्थानावर झेप, सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्विंटॉन डी कॉकची 67 धावांची दमदार खेळी… इशान किशन, हार्दिक पांडय़ा, कायरॉन पोलार्डची महत्त्वपूर्ण खेळी… कृणाल पांडय़ाची अष्टपैलू चमक… अन् ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅट्टीनसन, जसप्रीत बुमराहच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर गतविजेत्या मुंबई इंडियन्सने रविवारी सनरायझर्स हैदराबादवर 34 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि ताजा गुणतालिकेत सहा गुणांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली. मुंबई इंडियन्सचा हा तिसरा विजय ठरला. सनरायझर्स हैदराबादला मात्र तिसऱया पराभवाला सामोरे जावे लागले.

वॉर्नरची अर्धशतकी झुंज
मुंबई इंडियन्सकडून मिळालेल्या 209 धावांचा पाठलाग करणाऱया सनरायझर्स हैदराबादला 7 बाद 174 धावा करता आल्या. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने दोन षटकार व पाच चौकारांसह 60 धावांची खेळी साकारली, पण इतरांची साथ न लाभल्यामुळे त्याच्या प्रयत्नांना यश लाभले नाही. मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्टने 28 धावा देत 2 फलंदाज बाद केले. जेम्स पॅट्टीनसनने 29 धावा देत 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. जसप्रीत बुमराहने 41 धावा देत 2 फलंदाज गारद केले.

रोहितने विकेट गमावली
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिले षटक टाकण्यासाठी संदीप शर्माच्या हातामध्ये चेंडू देण्यात आला. रोहित शर्माने याच षटकातील चौथ्या चेंडूवर पुल फटक्याच्या सहाय्याने शानदार षटकार मारला. मात्र पाचव्या चेंडूवर त्याच्याकडून एक चूक घडली. संदीप शर्माच्या स्वैर गोलंदाजीवर तो बाद झाला. जवळपास वाईड ठरणाऱया चेंडूशी रोहित शर्माने छेडछाड केली. तिसऱया पंचांकडे दाद मागण्यात आल्यानंतर त्याला बाद ठरवण्यात आला.

डी कॉकचे दमदार अर्धशतक
सलामीवीर क्विंटॉन डी कॉक याला या मोसमात मोठी खेळी करता आली नव्हती. पण या लढतीत त्याला सूर गवसला. त्याने 39 चेंडूंत 67 धावा तडकावल्या. या खेळीत त्याने प्रत्येकी चार षटकार व चार चौकार चोपून काढले. सुरुवातीला त्याने सूर्यकुमार यादवसोबत (27 धावा) 42 धावांची भागीदारी रचली. तसेच त्यानंतर इशान किशनसोबत (31 धावा) 78 धावांची भागीदारी रचण्यात क्विंटॉन डी कॉकला यश लाभले. राशीद खानच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.

हार्दिक, पोलार्ड, कृणालचा धमाका
हार्दिक पांडय़ा, कायरॉन पोलार्ड या जोडीने याही लढतीत आपला या मोसमातील सदाबहार फॉर्म कायम राखला. हार्दिक पांडय़ाने 19 चेंडूंत दोन षटकार व दोन चौकारांसह 28 धावांची खेळी साकारली. कायरॉन पोलार्डने नाबाद 25 धावांची खेळी तीन चौकारांसह सजवली. कृणाल पांडय़ाने अवघ्या चार चेंडूंमध्ये दोन चौकार व दोन षटकारांसह नाबाद 20 धावांची तुफानी खेळी केली. मुंबई इंडियन्सने 5 बाद 208 धावा केल्या.