महापालिका महासभेची मंजुरी, श्यामाप्रसाद मुखर्जी चौक वाहतूक बेटावर शिवसेनाप्रमुखांचा पुतळा

474

दक्षिण मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील बेटावर शिवसेनाप्रमुखांचा 9 फुटी पुतळा उभारला जाणार आहे. यासाठी 2 फूट उंच हिरवळीसह (लँडस्केप) 11 फूट उंच चबुतरा उभारला जाणार आहे.

मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाचे स्फूल्लिंग चेतवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या धगधगत्या आणि झंझावाती कारकिर्दीला सलाम करण्यासाठी मुंबई महानगरपालिका फोर्ट परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटावर शिवसेनाप्रमुखांचा भव्य पुतळा उभारणार आहे. शिवसेनाप्रमुखांच्या दिमाखदार 9 फुटी पुतळ्याच्या उभारणीला महानगरपालिकेच्या महासभेत मंगळवारी एकमताने मंजुरी देण्यात आली.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण हिंदुस्थानचे लाडके नेते होते. देशाच्या लाडक्या नेत्याचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी महानिर्वाण झाले. शिवसेनाप्रमुखांचे विचार, त्यांनी केलेल्या लोकोपयोगी, सामाजिक कार्याचे स्फूर्तिदायक स्मरण लोकांसमोर कायम राहावे यासाठी शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी त्यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारला जावा अशी मागणी गेली अनेक वर्षे होती. या मागणीचा पाठपुरावा करत फोर्टमधील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये शिवसेनाप्रमुखांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा याबाबतचा प्रस्ताव नुकताच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर केला होता. आज महासभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीचा तातडीचा प्रस्ताव सभागृहासमोर मांडला. त्याला महासभेने एकमताने मंजुरी दिल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रस्ताव मंजूर केला.

  • महानगरपालिकेच्या नियमानुसार, वाहतूक बेटे आणि फुटपाथवर पुतळा उभारण्यात येऊ नये असे धोरण आहे. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारणे ही एक अपवादात्मक आणि विशेष बाब म्हणून फक्त या पुतळा उभारणीस मुंबई महानगरपालिकेने हे धोरण शिथिल केले आहे.
आपली प्रतिक्रिया द्या