
मुंबई महानगरपालिकेने गेल्या साडेपाच महिन्यात मुंबईच्या कानाकोपऱ्यात राबवलेल्या मोहिमेत डेंग्यू, मलेरियाला पोषक ठरणाऱ्या सुमारे 1 लाख 8 हजार 26 छोट्या-मोठया वस्तू आणि 514 टायर्स हटवले आहेत. मात्र, आता पावसाळ्याच्या तोंडावर घरात आणि घराबाहेरील भांड्याकुंड्यांमध्ये पाणी साचणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
मुंबईत डेंग्यू, मलेरिया यासारख्या साथीच्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसाराला प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याच्या दृष्टीने घरांची व घरांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे नियमितपणे करण्यात येत असते. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत राबवण्यात आलेल्या मोहिमेत डेंग्यू, मलेरियाला पोषक ठरणारी बाटलीचे झाकण, टायर, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, वातानुकुलन यंत्रणा, शीतकपाटाचा (रेफ्रिजरेटर) डिफ्रॉस्ट ट्रे, रिकामी शहाळी, रोप कुंड्यांखालील ताटल्या यासारख्या विविध वस्तू पालिकेने हटवल्या आहेत. साचलेले चमचाभर पाणीही शेकडो डासांच्या उत्पत्तीचे कारण ठरु शकते, हे लक्षात घेऊन पावसाचे वा इतर पाणी साचू शकेल, अशा इतर वस्तूदेखील महापालिकेने हटवल्या आहेत. डेंग्यूचे संक्रमण करणारी डासाची मादी ही साधारणपणे दिवसा चावते, तर मलेरियाचे संक्रमण करणारी डासाची मादी ही बहुतांशी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान चावते. डास चावू नये, यासाठी मच्छरदाणीचा वापर, मलम, शरीर अधिकाधिक झाकले जाईल असे कपडे वापरण्यासारख्या बाबींचा अवलंब करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
सर्वाधिक वस्तू ई विभागात, एफ/दक्षिणमध्ये टायर्सचा साठा
1 जानेवारी पासून आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 16 हजार 355 वस्तू महापालिकेच्या ‘ई’विभागातून हटवण्यात आल्या आहेत तर त्या खालोखाल 9 हजार 358 वस्तू ‘जी दक्षिण’ विभागातून, 5 हजार ३२ वस्तू या ‘ए’ विभागातून हटवण्यात आल्या आहेत. याच पद्धतीने महापालिकेच्या सर्व 24 विभागातून 1 लाख 8 हजार 26 इतर वस्तू हटवण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागात सर्वाधिक म्हणजे 123 टायर्स हटवण्यात आले तर त्या खालोखाल ‘एन’ विभागातून 99 व ‘एफ उत्तर विभागातून 71 टायर्स हटवण्यात आले तर सर्व 24 विभागातून 514 टायर्स हटवण्यात आले आहेत, अशीही माहिती कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली आहे.































































