नदी-नाल्यांवरच्या अतिक्रमणांवरही ड्रोनची नजर; दहिसर, पोयसर नदीकिनारी सर्वेक्षण सुरू

447

परिणामकारक नालेसफाईसाठी ड्रोनने कामाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता नदी-नाल्यांवरील अतिक्रमणांचे सर्वेक्षणही पालिकेने ड्रोनच्या माध्यमातून करण्याचे ठरवले आहे. दहिसर, पोयसर नदीकिनारी असलेल्या अतिक्रमणांचे सर्वेक्षण ड्रोनच्या माध्यमातून करण्याचे काम सुरू झाले आहे. यामध्ये बेकायदेशीर आढळलेल्या बांधकामांवर लवकरच कारवाईदेखील केली जाणार आहे.

नदी-नाल्याशेजारील अनधिकृत बांधकामांमुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. 26 जुलै 2005 मध्ये मुंबईत आलेल्या पुरात मुंबईतील मिठी नदीसह लहान मोठ्या नाल्यांमध्ये असणार्‍या बेकायदेशीर बांधकामांचा प्रश्न समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकने अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवण्याचे कामही सुरू केले. तरीदेखील मुंबईच्या अनेक भागात थेट नाल्यांवर झोपड्या बांधणे, नदीच्या किनारी झोपड्या बांधणे, अतिक्रमणे करण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे नदी-नाल्यांचे पाणी शहरात, लोकवस्तीत घुसण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. शिवाय या अतिक्रमणाच्या ठिकाणी राहणार्‍या रहिवाशांकडून मोठ्या प्रमाणात कचरा, प्लॅस्टिकही टाकले जात असल्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. याला आळा घालण्यासाठी पालिकेने आता कठोर उपायोजना करण्यात येत आहेत.

550 लहान-मोठ्या नाल्यांसह नदींवर वॉच राहणार

मुंबईत मिठी नदीसह ओशिवरा, पोयसर, दहिसर आणि वाकोला अशा नद्या आहेत. या नद्यांच्या प्रवाहाच्या वाटेवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेले आढळते. यामध्ये मुंबईतील महत्त्वाची असलेल्या मीठी नदीचा शहरात 6.255 किमी, पूर्व उपनगरात 13.030 किमी आणि पश्चिम उपनगरात 2.220 मिळून 21.505 किमीची लांबी आहे. या नदीतून दरवर्षी 97181 मेट्रिक टन गाळ काढण्यात येतो. तर पालिकेच्या क्षेत्रात शहर 27, पूर्व उपनगरात 111 आणि पश्चिम उपनगरात मिळून 280 नाले आहेत. यांची एकूण लांबी 263.94 किमी आहे. यामधून दरवर्षी 253846 मेट्रिक टन गाळ काढला जातो. मात्र अतिक्रमणांमुळे पावसाळ्यात पाणी वाहून अडथळा निर्माण होतो.

आपली प्रतिक्रिया द्या