पालिका भटक्या कुत्र्यांचा करणार ‘बंदोबस्त!’

भटक्या कुत्र्यांपासून होणाऱ्या उपद्रवातून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी पालिका प्रत्येक परिमंडळात कुशल मनुष्यबळासह एक अशी सात श्वान वाहने उपलब्ध करणार आहे. यामध्ये भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण, रेबीज लसीकरण करण्यात येणार आहे. ज्यामुळे श्वानांची संख्या नियंत्रणात येणार असल्याने उपद्रव कमी होण्यास मदत होणार आहे. यामध्ये एका श्वानासाठी 680 रुपये खर्च केला जाणार आहे

भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेच्या श्वान नियंत्रण विभागाकडून पालिकेच्या हद्दीत फिरणाऱ्या श्वानांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण, रेबीज लसीकरण करून पुन्हा त्यांना त्यांच्या मूळ परिसरात सोडण्यात येते. यानुसार 2014 मध्ये श्वानांची गणना करण्यात आली. यामध्ये मुंबईतील 95 हजार 174 भटक्या श्वानांपैकी 25 हजार 935 श्वानांचे निर्बिजीकरण, रेबीज लसीकरण करण्यात आले नव्हते. यामध्ये 14674 नर 11261 श्वानांचा समावेश होता. निर्बिजीकरण केले नसलेली एक मादी 4 पिलांना जन्म देते. ही पिल्ले वर्षभरात प्रजननक्षम होतात. यामुळेच श्वानांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय प्राणी कल्याण मंडळाने घालून दिलेल्या निर्देशांन्वये वर्षाला 30 टक्के श्वानांचे निर्बिजीकरण करण्यासाठी पालिका श्वान नियंत्रणासाठी उपाययोजना करीत आहे. दरम्यान, नव्या 7 श्वान वाहनांबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समिती बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.

…म्हणूनच श्वान वाहनांची संख्या वाढवणार

पालिकेच्या श्वान नियंत्रण विभागात तब्बल 50 टक्के पदे रिक्त आहेत. यातच श्वान पकडण्याबरोबरच नागरिकांकडून आलेल्या तक्रारींचा पाठपुरावाही करावा लागतो. याचा परिणाम निर्बिजीकरणाकरिता श्वान पकडण्यावर होतो. सद्यस्थितीत 4 वाहनांमार्फत (पालिकेचे 1 व भाडेतत्त्वावरील 3) श्वान पकडण्यात येतात. याशिवाय ३ अशासकीय संस्थांमार्फत श्वान पकडण्याचे काम केले जाते. ही यंत्रणा मर्यादित ठरत असल्याने सातही झोनमध्ये कुशल मनुष्यबळासह प्रत्येकी एक वाहन वाढविण्यात येणार आहे.

असे करणार काम

  • मुंबईत श्वानांची संख्या पाहता प्रत्येक वर्षी 32 हजार श्वानांचे निर्बिजीकरण, रेबीज लसीकरण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात येईल.
  • 2014 पासून 2019 पर्यंत पालिका आणि अशासकीय संस्थानी एकूण केलेल्या 90703 निर्बिजीकरण, रेबीज लसीकरणाचे प्रमाण पाहता अतिरिक्त 17 हजार श्वान पकडणे आवश्यक आहे.
  • यानुसार 7 विभागात 7 वाहने व त्यांना दिवसाचे 8 श्वान प्रतिवाहन ठरवून दिल्यास पालिकेद्वारे सुमारे 17 हजार आणि अशासकीय संस्थाद्वारे 15 हजार असे वर्षाचे एकूण 32 हजार उद्दिष्ट्य साध्य केले जाणार आहे.
आपली प्रतिक्रिया द्या