उघड्यावर घाण केलात तर 100 ते 1000 रुपये दंड

मुंबईत पालिकेने दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा क्लीन-मार्शलची नेमणूक केली असून आज फोर्टमधून कारवाईला सुरुवात करण्यात आली. यामध्ये उघडय़ावर थुंकणे, अस्वच्छता करणे, घाण केल्यास 100 ते 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. पालिकेच्या ‘ए’ विभाग फोर्टमधून या कारवाईला सुरुवात करण्यात आली असून तातडीने सर्व 25 वॉर्डमध्ये क्लीन-अप मार्शलकडून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱयांवर कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबईत गेल्या दोन वर्षांपूर्वी ‘क्लीन-अप मार्शल’ पुरवणाऱया संस्थेच्या कंत्राटाची मुदत संपल्याने सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱयांविरोधात कारवाई थांबली होती, मात्र आजपासून पुन्हा ही कारवाई सुरू झाली. अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे. उद्या बुधवारी ‘सी’ विभाग मुंबई सेंट्रल विभागात ही कारवाई सुरू होणार आहे. या क्लीन-अप मार्शलचे वैशिष्टय़ असे की, सर्क दंडात्मक कारवाई ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यासाठी प्रत्येक क्लीन-अप मार्शल संस्थेने प्रत्येक विभागात प्रशिक्षित क्लीन-अप मार्शलची नेमणूक केली आहे. यामध्ये आकारलेल्या दंडाची अर्धी रक्कम संबंधित कंत्राटदाराला तर अर्धी रक्कम पालिकेला मिळणार असल्याने महसूलही मिळणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वादावादी टळणार, पारदर्शक वसुली

महापालिकेच्या आयटी विभागाने ऑनलाइन ऍपद्वारे दंडात्मक रक्कम वसूल करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी क्लीन-अप मार्शलकडे मोबाईल ब्ल्यूटूथवर चालणारा छोटा प्रिंटर देण्यात आला आहे. या प्रिंटरद्वारे दंडाकरिता स्वतंत्र पावती छापून दिली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

शिवाय सामान्य नागरिकांना मार्शलकडून कुठलीही अरेरावी होणार नाही. तसेच इतर कोणत्याही छापील पावतीचा वापर केला जाणार नाही. त्याच प्रमाणे दंडाची रक्कम ही क्लीन-अप मार्शल संस्थेच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. यामुळे रोख पैशांची हाताळणी होणार नसून कामामध्ये पारदर्शकता येणार आहे.

दोन वर्षांत 80 कोटींची वसुली

क्लीन-अप मार्शलवर केवळ सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱयांवर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले होते. मात्र दोन वर्षांच्या कोरोना काळात ‘क्लीन-अप मार्शल’नी विनामास्क फिरणाऱया 40 लाख जणांवर कारवाई करून 80 कोटी रुपयांवर दंड वसूल केला आहे.