उपकरप्राप्त इमारतींमध्ये पाण्याच्या भूमिगत टाक्या! उन्हाळ्यातील ‘टंचाई काळा’साठी पालिकेचा निर्णय

73

उन्हाळ्यात पाण्याचा दाब कमी झाल्यास टोलेजंग इमारतींवरील पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी पोहोचत नाही. त्यामुळे रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी मालमत्ता विभागाच्या उपकरप्राप्त इमारतींमध्ये आता पाण्याच्या भूमिगत टाक्या बांधण्यात येणार आहेत. यामुळे उन्हाळ्यात पाणीकपात झाली तरी नागरिकांना पुरेसे पाणी मिळण्यास मदत होणार आहे.

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यात पावसाळा संपल्यानंतर 1 ऑक्टोबर रोजी तलावातील पाण्याचा आढावा घेतला जातो. या वेळी पुढील वर्षभरासाठी सातही तलावांत मिळून 1447363 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध असणे आवश्यक असते. 1 ऑक्टोबर 2018 रोजी 2 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठी कमी असल्याचे समोर आले होते. त्यामुळे नोव्हेंबर 2018पासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात करण्यात आली होती. 20 जुलै 2019 रोजी ही 10 टक्के पाणीकपात मागे घेण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात निर्माण होणाऱया पाण्याच्या टंचाईचा सामना करण्यासाठी आणि पाण्याचा दाब कमी झाल्यानंतरही पाण्याची साठवणूक करता यावी यासाठी उपकरप्राप्त इमारतींमध्ये भूमिगत पाण्याच्या टाक्या बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

…म्हणूनच घेतला निर्णय

  • पालिकेच्या मालमत्ता विभागाच्या अखत्यारीतील जुन्या उपकरप्राप्त असलेल्या इमारतींच्या वरच्या भागातच पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी पाणी साठवून ठेवण्यास तळाला जागा नसल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची कपात किंवा पाण्याचा दाब कमी झाल्यास वरील टाक्यांमध्ये पाणी पोहोचत नाही.
  • याबाबत नगरसेविका नेहल शाह यांनी पालिकेत ठराव मांडला होता. यावर पालिका आयुक्तांनी अभिप्राय देताना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जुन्या उपकरप्राप्त, मक्त्याने दिलेल्या भूखंडावरील इमारतींमध्ये मक्ताधारकाने विनंती केल्यास संबंधिताना ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र देण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
आपली प्रतिक्रिया द्या