
मुंबई महापालिकेने कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणली असतानाच संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण वाढवण्यावर भर देत असून प्रत्येक प्रभागात एक लसीकरण केंद्र या उपक्रमानुसार बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह परिसरात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले.
संभाव्य तिसऱया लाटेला रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जावा, लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी. त्यासाठी महापालिकेच्या 227 प्रभागांमध्ये प्रत्येकी एक अशी 227 लसीकरण केंद्रे सुरू करावीत, अशी सूचना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिकेला केली होती. त्या पार्श्वभूमीवर, पालिका कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यावर भर देत आहे. बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहाच्या परिसरात आज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते ऑनलाइनद्वारे केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार विलास पोतनीस, मनीषा चौधरी, स्थानिक नगरसेवक-नगरसेविका, उपायुक्त विश्वास शंकरवार, साहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे, सिनेट सदस्य शशिकांत झोरे आदी उपस्थित होते.


























































