स्मशानभूमीतील कर्मचाऱयांचा प्रलंबित ओटी द्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून महापालिकेचे आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कोरोनाला रोखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. यात पालिका स्मशानभूमीतील कर्मचारीही सुट्टीr न घेता सलग अनेक दिवस काम करत आहेत. त्यांना गेली 4 वर्षे अतिरिक्त कामाचा ओटीही मिळालेला नाही. त्यामुळे कोरोनाच्या साथीत जिवाची पर्वा न करता काम करण़ाऱया या कर्मचाऱयांचा प्रलंबित ओटी तत्काळ द्या, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका प्रशासनाकडे केली आहे.

मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेचे आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील मिळून सुमारे 1 लाख कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. कोरोना रुग्णांवर विविध पालिका तसेच खासगी रुग्णालयांवर यशस्वी उपचार होऊन कोरोनामुक्त होत आहेत. मात्र, दुर्दैवाने काही रुग्ण त्यांना असणाऱया व्याधींमुळे कोरोनाविरोधातली लढाई हरतात. अशा कोरोनामुळे मृत्यू पडलेल्या मृतांचा अंत्यविधी स्मशानभूमीतील कामगारच करत आहेत. स्मशानभूमीत सतत उष्णतेच्या जवळ राहिल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत आहे. त्यात काही कामगार प्रकृतीमुळे गैरहजर राहिल्यामुळे त्याचा ताण इतर कामगारांवर येत असतो. मात्र, अशाही परिस्थितीत हे कामगार आपले कर्तव्य न चुकता प्रामाणिकपणे बजावत असतात. काहींना सलग 7-7 दिवस काम करावे लागत आहे. त्यातच 2017 पासून शीव तसेच इतरही स्मशानभूमीतील कामगारांच्या अतिरिक्त कामाचा (ओटी)चा प्रश्न प्रलंबित आहे. याबाबत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना अध्यक्ष बाबा कदम, चिटणीस रामचंद्र लिंबारे यांनी पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांना पत्र देऊन कामगारांचे ओटी तसेच इतर प्रश्न सोडवावेत, अशी मागणी केली आहे.