अंकातील गणपती, बोरिवलीचे कलाशिक्षक मनोहर बाविस्कर यांचा कलाविष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणराय म्हणजे कलेची आद्य देवता, चौसष्ट कलांचा अधिपती. कलावंत कलेच्या माध्यमातून गणेशाची आराधना करतात. याच भावनेतून अनोख्या कलाकृती साकारण्याकडे कलावंतांचा कल असतो. बोरिवलीचे मनोहर बाविस्कर यांनी ‘अंकातील गणपती’ ही अनोखी संकल्पना साकारली आहे. बाविस्कर यांनी रांगोळीच्या माध्यमातून एक ते दहा अंकांतील गणरायाची मनमोहक चित्रे साकारली आहेत. त्यांना सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मनोहर बाविस्कर कला शिक्षक आहेत. ते गेल्या 23 वर्षांपासून प्रगती विद्यालय, बोरिवली पश्चिम शाळेत कला शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, हस्तकला प्रदर्शन असे अनेक कला उपक्रम ते सातत्याने राबवतात. महाराष्ट्र कला अध्यापक संघाचा आदर्श कला शिक्षक पुरस्कारदेखील मिळालेला आहे. कला क्षेत्रात ते नावीन्यपूर्ण प्रयोग करत असतात. यंदाच्या गणेशोत्सवात बाविस्कर यांनी रांगोळीच्या माध्यमातून एक ते दहा या अंकांतील विविध गणपती साकारले आहेत. त्यांनी कागदावर चाळणीने रांगोळी टाकून त्यावर बोटाने किंवा बोरूने एक-एक अंक काढून त्यातून अप्रतिम गणराय साकारले आहेत.

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करताना बाविस्कर यांनी विक्रमी प्रयोग केला होता. त्यांनी ‘विघ्नहर्ता गणपती’ या शीर्षकांतर्गत 10 तासांत 1250 चित्रे काढण्याचा विक्रम केला. बाविस्कर यांच्या कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकाॅर्डने घेतली.

अलीकडे इंदूर येथे रडार संस्थेतर्फे जगभरातील नामवंत कलाकारांना फेसबुकच्या माध्यमातून एकत्र करून गिनिज बुक रेकाॅर्डसाठी एकूण 1149 चित्रे साकारण्यात आली होती. चित्रे एका तासात अपलोड करायची होती. यामध्ये बाविस्कर यांचा सहभाग होता.