मोनोरेलला सप्टेंबरपर्यंत ब्रेक, वीजपुरवठा करणाऱया यंत्रणेत बिघाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-monorail-001

सामना प्रतिनिधी। मुंबई

मोनोरेलला डीसी वीजपुरवठा करणारी यंत्रणा जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे कुचकामी ठरल्याने मोनोरेलचे संचलन तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय एमएमआरडीए प्रशासनाने घेतला आहे. नवीन यंत्रणा सप्टेंबरपर्यंत तयार होण्याची शक्यता आहे.

मोनोरेल डीसी करंटवर धावत असून तिला सातत्यपूर्ण वीज पुरवठा करणाऱया यंत्रणेचे काम इंग्लंडस्थित ‘फेव्हेली ब्रेकनेल विलीस’ या कंपनीला दिलेले आहे. या यंत्रणेची 30 ते 40 दिवस चालण्याची क्षमता जोरदार पावसाने 10 ते 15 दिवसांवर आली आहे. फेव्हेली ब्रेकनेल विलीस कंपनीला जोपर्यंत पुढील मानधन मिळणार नाही तोपर्यंत तिने वीज पुरवठा यंत्रणा तयार न ठेवण्याचा निर्णय घेतल्याने अडचण निर्माण झाली आहे. या यंत्रणेची पुढील डिलिव्हरी सप्टेंबरमध्ये आहे.

सहा मिनिटांनी एक ट्रेन
मलेशियन कंपनी स्कोमीकडून मोनोचे व्यवस्थापन एमएमआरडीएने आपल्या हातात घेण्यापूर्वी डिसेंबर 2018 मध्ये दोन ट्रेन कार्यरत होत्या. सध्या मोनोरेलच्या पाच ट्रेन कार्यरत असून आणखी दोन ट्रेन सुरू करण्यात येणार असून सप्टेंबर 2019 पर्यंत सात ट्रेन कार्यरत होणार आहेत. एमएमआरडीएने आणखीन दहा मोनोरेलसाठी टेंडर काढले. त्यामुळे 2021 नंतर मोनोच्या ताफ्यात 17 ट्रेन येणार असून त्यामुळे दर सहा मिनिटांनी एक ट्रेन सोडता येईल.