बेस्टचालकास हृदयविकाराचा झटका; चेंबूर येथे बस दुकानात घुसली

धावत्या बेस्टच्या बस चालकास अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचे बसवरचे नियंत्रण सुटून बस सिग्नलला धडपून रस्त्याकडेच्या दुकानात घुसल्याचा विचित्र अपघात मंगळवारी सकाळी चेंबूरच्या वसंत पार्क येथे घडला. या बसचालकाला तातडीने राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून केवळ दैव बलवत्तर म्हणून या अपघातात कोणासही इजा झाली नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

बस मार्ग क्र. 381 या घाटकोपर आगार ते टाटा पॉवर कंपनी धावणाऱया मिडी बसचा चालक हरिदास पाटील (53) याला अचानक चेंबूरच्या वसंत पार्क सिग्नलजवल हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने तो स्टीअरिंगवरच चक्कर येऊन कोसळला. त्यामुळे बसचे नियंत्रण सुटून ती डावीकडे सिग्नलच्या खांबावर धडपून दुकानात घुसली. या घटनेने प्रवासी घाबरले. या बसमध्ये बस वाहक शाम बोराडे (51) आणि नऊ प्रवासी होते, त्यांना सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. बस चालक हरिदास पाटील यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या