
सामना ऑनलाईन। मुंबई
मुंबईतील वांद्रे येथे आईची वाट बघणाऱ्या एका 12 वर्षीय मुलावर शेजारणीने (45) लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. आई घरात नसल्याने पीडित मुलगा शेजारी राहणाऱ्या महिलेच्या घरात बसून आईची वाट बघत होता. त्याचवेळी आरोपी महिलेने त्याचे लैंगिक शोषण केले. मुलाचे वडील त्याला न्यायला आले असता ही घटना समोर आली. दरम्यान, याप्रकरणी आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून तिच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
पीडित मुलाचे आई वडील विभक्त राहत असून त्याची आई वांद्रे येथे राहते. तर तो वडिलांबरोबर दुसरीकडे राहतो. रविवारी सुट्टी असल्याने तो आईला भेटण्यासाठी वांद्रे येथे आला होता. पण दरवाजाला टाळे असल्याने शेजारणीने त्याला आपल्या घरात बसून आईची वाट बघण्यास सांगितले. त्यामुळे मुलगा शेजारणीच्या घरात गेला. शेजारणीने त्याची चौकशी केली व ती त्याला नको तिथे स्पर्श करू लागली. मुलाने यास विरोध करताच तिने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले.
याप्रकारामुळे घाबरलेल्या मुलाला तिने याबद्दल कोणासही काही सांगायचे नाही अशी धमकीही दिली. त्यामुळे मुलगा घाबरून गप्प बसला. थोड्या वेळाने त्याचे वडील त्याला नेण्यासाठी आले. त्यावेळी त्यांना मुलगा घाबरलेला दिसला. यामुळे वडिलांना संशय आला. त्यांनी त्याला विश्वासात घेऊन काय झाले असे विचारले. त्यावर मुलाने त्यांना झालेल्या घटनेबद्दल सांगितले. मुलावर अत्याचार झाल्याचे कळताच वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. मुलाने पोलिसांनाही सर्व काही सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. सोमवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.


























































