कोरोना चाचण्यांमध्ये मुंबई कोट्यधीश, आतापर्यंत 1 कोटी 18 हजार 770 चाचण्या पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून करण्यात येणाऱया लसीकरणात 4 सप्टेंबरला 1 कोटींचा टप्पा पार केल्यानंतर आज आरटीपीसीआर आणि अँटीजेन या कोरोना निदान चाचण्यांनी 1 कोटी 18 हजार 770चा टप्पा पार केला. कोरोनाला रोखण्यात या चाचण्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून रुग्णांवर जलद उपचार करणे शक्य झाल्यामुळे मुंबईत कोरोनाला नियंत्रणात आणणे शक्य झाले आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अहोरात्र मेहनत घेत असून यात सुरुवातीपासून चाचण्या आणि लसीकरणावर भर देण्यात येत आहे. महापालिकेने 3 फेब्रुवारी 2020पासून आरटीपीसीआर चाचण्या सुरू केल्या तर त्याहीपेक्षा वेगवान अशा अँटीजेन चाचण्या जुलै 2020पासून जलद निदानासाठी वापरल्या जात आहेत. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी चाचणी हा पहिला टप्पा आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने 260हून जास्त जागांवर मोफत चाचण्या सुरू आहेत.

मुंबईत दुसऱयांदा मृत्यू संख्या एकवर

मुंबईत गेल्या काही दिवसांत दररोज रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे 400च्या पुढे गेले असताना आज हे प्रमाण 100ने घटून 352वर आले. त्याचबरोबर मुंबईत आज केवळ एकाचा मृत्यू झाला आहे. याआधी 22 ऑगस्टला मुंबईत एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. गेल्या दीड वर्षातील हा नीचांकी आकडा होता. दरम्यान, मुंबईत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांवर कायम आहे. त्याचबरोबर दररोजच्या मृत्यूचे प्रमाणही गेले काही आठवडे 5वर स्थिर आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 1 हजार 177वर पोहोचला आहे.