कोरोनाच्या सौम्य लक्षणांवर ‘आयुष 64’ ठरतेय प्रभावी

कोरोनाच्या सौम्य लक्षणांवर ‘आयुष 64’ हे औषध प्रभावी ठरत असून यातून अन्य उपचारांबरोबरच हे औषधही घेतल्यास त्याचे अधिक सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. आयुष मंत्रालयामार्फत हे औषध सध्या पुरविले जात असून मुंबईतील पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयात हे औषध मोफत उपलब्ध केले जात आहे, अशी माहिती सेवा भारती संस्थेचे सहायक संचालक डॉ. एम. एन. सूर्यवंशी यांनी दिली.

होम क्वारंटाइन असलेल्या रुग्णांसाठी ‘आयुष 64’ औषध हे उपयोगी ठरत आहे. आयुष मंत्रालयातर्फे कोरोना रुग्णांपर्यंत ‘आयुष 64’ पोहोचवले जाणार आहे. यासाठी सेवा भारती संस्थेची मदत घेतली जाणार आहे. सेवा भारती संस्थेला कोरोना रुग्णांची माहिती आणि औषध दिले गेले आहेत. यासंदर्भात निर्देश जाहीर करण्यात आले आहेत. देशभरातील सर्व केंद्रांमध्ये या औषधाचे मोफत वितरण होणार असल्याचे आयुष विभागाने सांगितलेय.

मलेरियावरही प्रभावी

आयुष मंत्रालयाने तयार केलेले ‘आयुष 64’ हे औषध कोरोना रुग्णांच्या सौम्य लक्षणांवर गुणकारी आहे. 1990 मध्ये मलेरियाच्या उपचारासाठी हे औषध विकसित करण्यात आले होते. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठीदेखील हे प्रभावी मानले जात आहे. कारण यात व्हायरसशी लढणे, ताप उतरवण्याचे गुण असल्याचे आयुष मंत्रालयातील तज्ञांनी स्पष्ट केले आहे. ‘आयुष 64’ हे औषध रुग्ण अॅलोपॅथिक गोळ्यांसोबत घेऊ शकतात. ‘आयुष 64’ चा कोणताही दुष्परिणाम झाल्याची तक्रार नसल्याचेही स्पष्ट केरण्यात आले आहे.

रुग्णाचे आधारकार्ड सोबत आणा औषध घेऊन जा

कोरोना रुग्णांसाठी ‘आयुष 64’ औषध विनामूल्य देण्यात येणार आहे. यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आणि रुग्णाचे आधारकार्ड सोबत आणणे गरजेचे आहे. मुंबईत वरळीच्या पोद्दार रुग्णालयात दररोज सकाळी 9.30 ते 4.30 या वेळेत हे औषध मिळू शकेल, अशी माहिती संस्थेचे सहायक संचालक डॉ. एम. एन. सूर्यवंशी यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या