
लॉटरीत घर लागूनही अनेक विजेत्यांना काही ना काही कारणाने ते घर घेता येत नाही. अशी तब्बल 1826 घरे म्हाडाकडे असून ही घरे आता संक्रमण शिबिरांसाठी वापरण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. इमारतींचा पुनर्विकास करताना रहिवाशांना संक्रमण शिबिरे उपलब्ध करून देताना म्हाडासमोर उभी राहणारी समस्या यामुळे काही अंशी दूर होणार आहे.
मुंबईत म्हाडाच्या 14 हजार 500 इमारती असून त्यामध्ये लाखो भाडेकरू वास्तव्याला आहेत. या इमारती जुन्या असल्याने अतिवृष्टी किंवा अन्य कारणाने इमारत धोकादायक झाल्यास मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून तेथील रहिवाशांना तत्काळ संक्रमण शिबिरात हलवले जाते. त्यामुळे मुंबई मंडळाला अनेकदा अपुऱया संक्रमण शिबिरांची समस्या जाणवते. त्यामुळे म्हाडाकडे पडून असलेल्या या लॉटरीतील 1826 घरे संक्रमण शिबिरांना मिळावीत असा प्रस्ताव मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी मांडला होता. त्याला मान्यता मिळाली असून म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनीही त्यासाठी होकार दर्शविला आहे.
300 चौरस फुटांपेक्षा लहान घरे संक्रमण शिबिरासाठी द्या – विनोद घोसाळकर
लॉटरीतील घरे पडून असल्याचे लक्षात आल्यानंतर 2011-2019 या कालावधीत म्हाडाने काढलेल्या लॉटरीचा आढावा घेतला. त्यामध्ये जवळपास 1826 विजेत्यांनी विविध कारणांस्तव सदरची घरे स्वीकारली नसल्याचे निदर्शनास आले. त्या पार्श्वभूमीवर घोसाळकर यांनी सदर घरांपैकी 300 चौरस फुटांपेक्षा लहान आकाराची घरे संक्रमण शिबिराला द्यावीत यासाठी उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांची भेट घेतली. सदर मागणी त्यांनी मान्य केल्याने संक्रमण शिबिरांचा प्रश्न सुटणार असल्याची प्रतिक्रिया विनोद घोसाळकर यांनी दिली.
खासगी विकासकांबरोबर भागीदारी करून म्हाडा उभारणार परवडणारी घरे!
म्हाडा हा गृहनिर्मितीतील विश्वसनीय ब्रँड अधिक व्यापक करण्यावर शासनाचा भर आहे. त्यामुळेच म्हाडा व खासगी विकासकांच्या सहकार्याने संयुक्त भागीदारी प्रकल्पाद्वारे परवडणाऱया दरातील गृहनिर्मितीवर भर देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे अशी माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज दिली. म्हाडा औरंगाबाद मंडळातर्फे औरंगाबाद शहर व जिह्यातील विविध गृहनिर्माण योजनांतील 864 सदनिकांच्या वितरणासाठी ऑनलाइन सदनिका सोडत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते आज ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.





























































