मुंंबईत विनामास्क फिरणाऱ्यांकडून 37 कोटी 27 लाखांचा दंड वसूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणे सुरू असून आतापर्यंत 18 लाख 45 हजार 777 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 37 कोटी 27 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी मास्क वापरणे, गर्दी टाळणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात स्वच्छ ठेवणे यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. मात्र विनामास्क फिरणाऱ्यांमुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबई महापालिकेने 20 एप्रिल 2020 पासून विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. आतापर्यंत एकूण 343 दिवसांत 18 लाख 45 हजार 777 विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत 37 कोटी 27 लाख 85 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे पालिकेच्या घनकचरा विभागातील अधिकाऱयाने सांगितले.

दुटप्पी भूमिका

मास्क असूनही त्याचा वापर योग्य पद्धतीने केला जात नाही. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण सुरू आहे. मात्र त्याचबरोबर मास्क वापरणे, गर्दी टाळून सुरक्षित अंतर पाळणे यांसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना मुंबईकरांनी कसोशीने पाळल्या पाहिजे. दुटप्पी भूमिका सोडली पाहिजे, असे मत पालिका अधिकाऱयाने व्यक्त केले.

मुंबई, रेल्वे पोलिसांचीही कारवाई सुरू

मुंबई रेल्वे पोलिसांनीही विनामास्क फिरणाऱया 8 हजार 636 लोकांवर कारवाई केली असून 17 लाख 27 हजारांचा दंड वसूल केला आहे, तर मुंबई पोलिसांनी 1 लाख 12 हजार 226 जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून 22 कोटी 44 लाख 5 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आता गाण्यांच्या माध्यमातून जागृती

मुंबईकरांनी मास्क लावावा यासाठी आता पालिका गाण्याच्या माध्यमातून जनजागृती करत आहे. विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या 15 टक्के आहे. त्यांच्यामुळे इतर मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यासाठी आता ‘अपने लिए, अपने माँ, बाप-बेटा, बेटी, के लिए मास्क पहने’ अशा गाण्यांमधून जनजागृती केली जात आहे, अशी माहिती घनकचरा विभागाच्या अधिकाऱयाने दिली.

मुंबईकर अजूनही बेशिस्तच

कोरोनाला रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी फिरताना गर्दी टाळून सुरक्षित अंतर पाळणे यासह मास्क वापरण्याची सक्ती पालिकेकडून करण्यात आली. सुरुवातीला हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत होता, मात्र काही दिवसांनी हा दंड कमी करून तो 200 रुपये करण्यात आला. लोकांकडून दंड वसूल करणे हा हेतू नसून लोकांना शिस्त लागावी यासाठी दंडाची रक्कम कमी करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले, मात्र मुंबईकरांना शिस्त लागलीच नाही. मुंबईकर अजूनही सार्वजनिक ठिकाणी फिरताना बेफिकीर आहे, हे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने दाखवून दिले आहे.