
राज्यातील तापमानाचा पारा उतरला असतानाच मुंबईकरांना कोरोना रुग्णसंख्येनेही दिलासा दिला आहे. मागील कित्येक दिवस सतत चढता आलेख नोंदवत मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या 20 हजारपार पोहोचली. मात्र हा चढता आलेख सलग दुसऱया दिवशी खाली आला आहे. आज तर राज्याची रुग्णसंख्या 44 हजार 388 इतकी नोंदवली गेली असताना मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या मात्र 1 हजाराने कमी होत 19 हजार 474 इतकी नोंदवली गेली.
राज्यात कोरानाचा संसर्ग झपाटय़ाने होत असताना मुंबई आणि पुणे जिह्यातील आकडेवारी ही सर्वाधिक होती. मुंबईत 20 हजार 971 रुग्णसंख्येपर्यंत कोरोनाची मजल गेली होती. मात्र त्यानंतर शनिवारी 20 हजार 318 आणि आज 19 हजार 474 रुग्णांची नोंद झाली. तर 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सलग दुसऱया दिवशी हा आलेख खाली आल्याने कोरोनापासून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यातच राज्य सरकारचे कठोर निर्बंधही आजापासूनच लागू होत आहेत. याच्या परिणामी होणारी गर्दी कमी होऊन हा रुग्णांचा आकडा आणखी कमी होईल.
मुंबईतील कोरोनाचे 80 टक्के बेड रिकामीच
कोरोनाचा आकडा वाढला असला तरी मुंबईतील कोरोना केंद्रे तसेच रुग्णालयांतील 80 टक्के बेड आजही रिकामेच आहेत. याचा अर्थ रुग्ण घरच्या घरी उपचाराने बरे होत आहेत. 34 हजार 960 बेडपैकी आतापर्यंत 7 हजार 432 बेड म्हणजे 21 टक्के बेडवर रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे आज एकाच दिवसात 8 हजार 63 रुग्णही बरे झाले आहेत.































































