लॉकडाऊन इफेक्ट; मुंबई शहरात गुन्हेगारीत लक्षणीय घट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे जसे वाईट परिणाम झाले आहेत. तसेच याचे काही चांगले परिणाम ही झाले आहेत. मुंबईत लॉकडाऊन दरम्यान खुनाचा प्रयत्न, घरफोडी, वाहनचोरी अशा सर्व गंभीर गुन्ह्यांमध्ये गेल्या दोन महिन्यांमध्ये मोठी घट झाली आहे. आश्चर्य म्हणजे दोन महिन्यांत चेन स्नॅचिंगच्या केवळ 2 घटना नोंदल्या गेल्या आहेत. यासोबतच महिलांवरील गुन्हेगारीत ही लक्षणीय घट झाली. बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांमध्येही घट झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गुन्हेगारीत घट झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी घसरण झाली. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत दाखल केलेल्या खटल्यांवर नजर टाकल्यास, एकूण 11895 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 9415 गुन्हे केवळ लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोंदवण्यात आले आहेत.

मुंबई पोलिस प्रवक्ते डीसीपी प्रणय अशोक यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउनमुळे रस्त्यांवर होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. लोक घरातबाहेर पडत नसल्याने हा परिणाम झाला आहे. बाजारात गर्दी नव्हती. गुन्हेगारांनाही बाहेर येण्याची संधी मिळाली नाही. याशिवाय रस्त्यावर पोलिसांची मोठी उपस्थिती होती. लॉकडाऊन कालावधीत शहरभरात 199 चौक्या कार्यरत होत्या. ज्याचा थेट परिणाम गुन्हेगारीच्या दरावर झाला.