
मुंबईत रुग्णसंख्या 32 हजारांवर गेली असली तरी यातील आठ हजार 400 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला असून 9 हजार जणांना कोणतीही लक्षणे नसल्यामुळे घरीच क्वारेंटाइन करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईत एकूण रुग्णांपैकी निम्म्याहून जास्त म्हणजेच 17 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आज पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली. एप्रिलमध्ये असणारा 7.6 मृत्यू दर आता 3.2 पर्यंत खाली आल्याचेही त्यांनी सांगितले.
पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह ऑनलाइन पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील कोरोनाच्या स्थितीची माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचनांनुसार पालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी करण्यात येणार्या उपाययोजनांना आता चांगलेच यश येत असल्याचे चहल यांनी यावेळी सांगितले. मुंबईत आता 15 हजार 800 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नसल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय समितीच्या अहवालानुसार 31 मेपर्यंत मुंबईत 40 हजार रुग्ण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र कोरोनामुक्त होणार्या रुग्णांची संख्या पाहता मुंबईत 31 मेपर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा 26 ते 27 हजारांपर्यंत नियंत्रित राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, रुग्णांची संख्या किती कमी होते हे पाहूनच लॉकडाऊन खुला करण्याबाबत राज्य सरकार विचार करेल अशी माहिती मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिली. मुंबई आणि राज्यातील त्या त्या भागातील स्थितीवर लॉकडाऊन खुले करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.































































