दुसऱ्या कोरोना लढय़ासाठी पालिका सज्ज! गरजेनुसार 75 हजारांपर्यंत खाटा वाढवण्याची क्षमता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची दुसरी लाट आल्याचे केंद्र सरकारकडूनच जाहीर करण्यात आल्यामुळे पालिकेनेही दुसऱया कोरोना लढय़ासाठी आपली संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यामध्ये रुग्णवाढ होत असताना बेडची कमतरता पडू नये यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असून गरजेनुसार 75 हजारांपर्यंत खाटा वाढवण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. सद्यस्थितीत उपलब्ध 27 हजार बेडपैकी 50 टक्क्यांहून जास्त बेड रिक्त असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली.

गेल्या वर्षी मार्चमध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पालिकेने वाढत्या रुग्णसंख्येनुसार कोरोना केअर सेंटर आणि सात जम्बो सेंटरमध्ये तब्बल 75 हजारांवर बेड तैनात ठेवले होते. मेपासून ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत रुग्णसंख्येने उच्चांक गाठल्यानंतर डिसेंबर-जानेवारीपासून रुग्णसंख्या चांगलीच आटोक्यात आली. जानेवारीत तर दैनंदिन रुग्णसंख्या 334 पर्यंत खाली आली, मात्र फेबुवारीपासून पुन्हा एकदा रुग्णवाढ होत असून दररोज दोन हजारांवर रुग्ण नोंदवले जात आहेत. त्यामुळे पालिकेने बेडची कमरतरता पडू नये यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. यासाठी सध्या वापरात नसलेले ऑक्सिजन बेड, आयसीयू आणि व्हेंटिलेटर तपासून घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

430 कोविड सेंटर आठ दिवसांत सुरू करता येतील

  • कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पालिकेने सात जम्बो कोविड सेंटरसह एकूण 517 कोरोना हेल्थ सेंटर सुरू केली होती. मात्र रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे यातील अनेक सेंटर बंद आहेत. यामध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी सुरू केलेल्या 336 कोरोना केअर सेंटर – 1 (सीसीसी-1) पैकी फक्त 26 केंद्रे सुरू आहेत. यातील 24 केंद्रे बफर प्रकारात म्हणजे दोन दिवसांत सुरू करता येतील अशा स्थितीत ठेवण्यात आली आहेत. z तर आठ दिवसांत सुरू करता येतील अशा ‘रिझर्व्ह’ प्रकारात 286 केंद्रे तैनात ठेवण्यात आली आहेत. तर लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी सुरू केलेल्या 181 सीसीसी-2 पैकी 144 केंद्रे रिझर्व्ह प्रकारात तर 29 केंद्रे बफर प्रकारात तैनात आहेत. सीसीसी-2 मधील 8 केंद्रांमध्ये रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

50 टक्क्यांपेक्षा जास्त बेड रिक्त

  • पालिकेकडे सद्यस्थितीत 26 हजार 711 बेड आहेत. यातील एकूण 11819 बेडवर रुग्णांवर उपचार सुरू असून 14 हजार 892 बेड रिक्त आहेत. z पालिकेकडे सद्यस्थितीत 1537 आयसीयू असून यातील 883 बेडवर रुग्णांवर उपचार सुरू असून 645 बेड रिक्त आहेत. z विविध कोविड सेंटरमध्ये 8085 ऑक्सिजन बेड असून 5046 बेड रिक्त आहेत तर 942 व्हेंटिलेटर बेडपैकी 377 बेड रिक्त आहेत.