Crime file – गोरेगावमध्ये तृतीय पंथीयाची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

गोरेगाव परिसरात राहणाऱ्या सुरेश ऊर्फ सूर्या मस्तूद या तृतीय पंथीयाची हत्या झाल्याची घटना आज दुपारी घडली. त्याच्या हत्येप्रकरणी बांगूरनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

सूर्या हा गोरेगाव परिसरात राहत होता. आज दुपारी तो गोरेगाव लिंक रोड परिसरातील एका हॉटेल जवळ रक्ताच्या थारोळ्यात दिसला. याची माहिती समजताच बांगूरनगर पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी पंचनामा करून सूर्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. सूर्याची हत्या नेमकी कोणत्या वादातून झाली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपासा दरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यावरून पोलीस तपास करत आहेत.

वाहनचालकांना लुटणाऱ्या टकटक गँगला जेरंबद

वाहनाच्या काचेवर टकटक करून चालकाचे लक्ष विचलित करायचे. मग संधी साधून गाडीतील किमती ऐवज लंपास करायचा, अशाप्रकारे गुन्हे करणाऱ्या टकटक गँगला टिळक नगर पोलिसांनी अटक केली आहे.

 ठाणे येथे राहणारे अभिजित हे पूर्व द्रुतगती महामार्गावरून ठाण्याच्या दिशेने निघाले होते. छेडानगर जंक्शन येथे सिग्नलला त्यांची कार थांबली असता एक व्यक्ती कारजवळ गेला आणि कारची काच ठोठावली.  त्यामुळे अभिजित यांनी कारची काच खाली केल्यावर त्या व्यक्तीने वाद घालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी आणखी एक व्यक्ती तेथे आल्याने अभिजित यांनी मागच्या दरवाजाची काच खाली केली. तिच संधी साधत पुढच्या दरवाजाजवळ वाद घालत उभ्या असलेल्या इसमाने  पुढच्या सीटवरील मोबाईल आणि लॅपटॉप काढून घेतला. याबाबत अभिजित यांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार देताच वरिष्ठ निरीक्षक सुनिल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सरिता चव्हाण आणि प्रविण डोईपह्डे यांनी तपास सुरू करून जफर जाहिर शेख या रिक्षा चालकाला पकडले. जफरच्या चौकशीत असे गुन्हे करणाऱ्या टोळीत एकूण पाच जणांचा समावेश असल्याचे समोर आले.