
पाणीपुरी विक्रेत्याबरोबर 50 रुपये देण्यावरून झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या फळ विक्रेत्याला एकाने चाकूने भोसकल्याची घटना सांताक्रूझ परिसरात घडली आहे. गणेश गुप्ता असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी अदनान टोले आणि समीर शेखला अटक केली. त्या दोघांना अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.
गणेश गुप्ता हे विलेपार्ले परिसरात राहतात. ते सांताक्रूझ परिसरात फळ विक्री करतात. तेथे एक जण पाणीपुरीचा स्टॉल लावतो. शनिवारी रात्री अदनान आणि समीर हे दोघे तेथे पाणीपुरी खायला गेले होते. पाणीपुरीचे 50 रुपये दिल्यावरून त्या दोघांचा पाणीपुरी विक्रेत्यासोबत वाद झाला. त्याच्यात शाब्दिक वाद झाला. तेव्हा गुप्ता हे दुकान बंद करून घरी जात होते.
रस्त्यावर गर्दी झाल्याने गुप्ता हे तेथे गेले. तो पाणीपुरी विक्रेता हा ओळखीचा असल्याने गुप्ता हे वाद मिटवण्यासाठी गेले. वाद मिटवत असतानाच अदनानने चाकूने गुप्ता याच्यावर वार केले. या घटनेची माहिती समजताच सांताक्रूझ पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी गुप्ताला रुग्णालयात दाखल केले. तर चाकू हल्ला प्रकरणी अदनान आणि समीर विरोधात गुन्हा दाखल केला.

























































