
गावी जायला पैसे न दिल्याच्या वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना कांदिवली परिसरात घडली. हिमेद्री राणा असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी तिचा पती दसा राणाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
कांदिवलीच्या चारकोप येथे डेपोजवळ सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. त्या साईडवर दसा हा त्याच्या पत्नीसोबत राहत होता. शनिवारी सकाळी दसा आणि हिमेद्री यांच्यात भांडण झाले. याची माहिती साईडवरील मुकादम यांना देण्यात आली. शनिवारी रात्री दसा आणि हिमेद्री यांच्यात भांडण झाले तेव्हा शेजारी राहणारे कामगार हे तेथे गेले. त्यांनी दसाच्या घराचा दरवाजा ठोकला, मात्र दसाने घराचा दरवाजा उघडला नाही.
हा प्रकार संशयास्पद वाटला तेव्हा एका कामगाराने इतर कामगारांची मदत घेऊन दरवाजा तोडायचे ठरवले. तेव्हा अचानक दसाने दरवाजा उघडला तेव्हा हत्येचा प्रकार उघड झाला. रात्री दसाने हिमेद्रीकडे गावी जायला पैसे मागितले. मात्र हिमेद्रीने पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. वाद झाल्यावर त्याने हिमेद्रीला मारहाण केली. मारहाण केल्यावर तिचा गळा आवळून हत्या केली.