अज्ञात मुलीच्या व्हिडीओ कॉलला विद्यार्थी भुलला, तोही रंगात आला आणि सेक्सटॉर्शनचा बळी पडला

आधी इंस्टाग्राम मग व्हॉट्सअपवर दोघांचे अश्लील चॅटिंग सुरू झाले. भामटय़ाने शिताफीने 26 वर्षीय विद्यार्थ्याला रंगात आणले आणि त्याला अश्लीलपणा करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याच्या त्या अश्लीलपणाच्या व्हिडीओच्या आधारे सेक्सटॉर्शन केले. त्या तरुणाला लाखो रुपयांचा गंडा घातला. पण माटुंगा पोलिसांनी हे सेक्सटॉर्शन करणाऱ्या राजस्थानातील दोघा भामटय़ांच्या मुसक्या आवळल्या.

सोनू (नाव बदलेले) या  विद्यार्थ्याला इंस्टाग्रामवर एक आयशी शर्मा या नावाने मैत्रीची विनंती आली. तरुणीने त्याच्याशी सेक्स चॅटिंग सुरू केले. त्यानंतर तिने व्हिडीओ कॉल केला. तेव्हा ती तरुणी निर्वस्त्र होती. तिला बघून सोनूदेखील अश्लिलपणा करू लागला.

तरुणीने त्याचा नको तो व्हिडीओ बनवूनत्याला पाठवून पैशांची मागणी केली. दुसऱ्या क्रमांकावरून सोनूला कॉल आला व समोरील व्यक्तीने त्याचे नाव एसीपी राम पांडे सांगून तो नवी दिल्ली सायबर क्राइम कार्यालयातून बोलत असल्याचे म्हणाला. आयशी शर्माविरोधात आम्ही दोषारोप पत्र तयार केले असून तिला अटक करणार आहोत. मग तुमचे दोन अश्लील व्हिडीओ डिलिट करण्यासाठी भामटय़ांनी सोनूकडे पैशांची मागणी केली.

सोनूने त्यांना लाखो रुपये पाठविले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. दिगंबर पगार तसेच मंगेश जऱहाड, महाले, निहारे यांनी तपास करून सावीर हमीदा खानला अटक करून एका 16 वर्षीय आरोपीस हजर राहण्याची नोटीस बजावली.