Mumbai Crime News – जुहू येथे पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या

पूर्ववैमनस्यातून गौस पटेल या तरुणाची हत्या केल्याची घटना जुहू परिसरात घडली. या प्रकरणी जुहू पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे, तर तीन जण फरार आहेत. गौस हा विलेपार्लेच्या प्रेमनगर येथे राहत होता. नौशाद शेख आणि असील शेख हे त्याचे मित्र आहेत. 11 मार्चला रात्री गौस हा प्रेमनगर येथून जात होता. तेव्हा पीर मोहम्मद, त्याचा भाऊ हसन, ताबिश कुरेशी, रिझवान सय्यद यांच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर चार दिवसांनी त्याचे पुन्हा भांडण झाले.

शनिवारी रात्री आरोपीने गौसकडे पाहून त्याला मारून टाकू अशी धमकी दिली होती. तेव्हा मुस्तफाला त्याच्या भावाला संबंधित आरोपी मारण्याचा कट रचत असल्याची माहिती समजली. त्यामुळे तो त्यांना समजवण्यासाठी गेला होता. तेव्हा त्यांच्यात पुन्हा वाद झाला. मुस्तफा, नौशाद, नूर मोहम्मद शेख, असील शेख आणि काहींनी गौसला बेदम मारहाण केली. काही वेळानंतर गौसचा भाऊ तेथे आला. त्याच्यावर देखील तीक्ष्ण हत्याऱ्याने वार केले. मारहाणीत गौस हा गंभीर जखमी झाला. रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी मृत घोषित केले.