पोलिसांनी वाचवले महिलेचे दीड लाख रुपये, उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाइन शॉपिंगवर खरेदी केलेले कपडे परत करण्याच्या नावाखाली महिलेच्या बँक खात्यातून दोन लाख रुपये ठगांनी काढले. उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलने तत्काळ तपास करून महिलेचे दीड लाख रुपये वाचवले आहेत. सायबर सेलच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तक्रारदार या दहिसर पूर्व येथे राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवरून काही कपडे मागवले होते. ते कपडे छोटे झाल्याने त्यांना ते परत करायचे होते. कपडे परत करण्यासाठी त्यांनी ऑनलाइनवर त्या कंपनीचा नंबर शोधला. त्या नंबरवर महिलेने फोन केला. कोरोनामुळे खरेदी केलेल्या वस्तू बदलून दिल्या जाणार नसल्याचे ठगाने महिलेला सांगितले. वस्तू न परत करता आपले पैसे आम्ही परत करू अशा त्याने भूलथापा मारल्या. पैसे परत करण्यासाठी काही प्रोसेस आहेत, त्या कराव्या लागतील असे सांगून महिलेला एनी डेस्क नावाचे अॅप्स डाऊनलोड करायला सांगितले.

अॅप्स डाऊनलोड झाल्यावर महिलेच्या बँक खात्यातून दोन लाख रुपये काढले गेले. बँक खात्यातून पैसे गेल्याचे समजताच महिलेने उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलमध्ये धाव घेतली. त्या महिलेच्या तक्रारीवरून तपास सुरू झाला. वरिष्ठ निरीक्षक सरला वसावे यांच्या पथकातील उपनिरीक्षक भुतेकर यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पैसे ज्या खात्यात जमा झाले त्याची माहिती काढली. ते खाते ओडिशा येथील असून त्यात फसवणुकीचे पैसे जमा झाले होते. पोलिसांनी त्या बँकेशी तत्काळ संपर्क साधून ते खाते फ्रीझ करण्यास सांगितले. दीड लाखापैकी महिलेचे एक लाख रुपये तिला परत करण्यात आले.