
मुंबईत दिल्लीसारखीच प्रदूषणाची पातळी वाढली आहे. त्यासाठी मुंबईकरांना प्रदूषण नियंत्रणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी परळच्या जनकल्याण समितीने ‘तेजोमय हिंदुस्थान घडवूया! पर्यावरण राखूया, सायकल चालवूया’ हा संदेश देत बालगोपाळांचा सायकल मॅरेथॉनचे आयोजन रविवारी केले होते. रविवारी सकाळी 7 वाजता वीर जिजामाता उद्यान (राणी बाग) ते दादर टीटी 15 वर्षांखालील बालगोपाळांच्या भव्य सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून या मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी संदीप वेलिंग (अध्यक्ष जनकल्याण समिती), मधू चव्हाण (मुंबई म्हाडा सभापती), यशवंत जाधव (अध्यक्ष, मुंबई मनपा स्थायी समिती), नगरसेविका सुरेखा लोखंडे, नगरसेवक रमाकांत रहाटे हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संस्कार वर्ग संयोजिका चित्रा वेलणकर यांच्या हस्ते सायकलद्वारे घरोघरी लहान बाळांना तेल मालिश करून उदरनिर्वाह करणाऱया मधुरा वायकर यांना नवीन सायकल देऊन सन्मानित करण्यात आले. या सायकल मॅरेथॉनमध्ये नोंदणीकृत 700 बाल सायकलस्वारांपैकी मोठय़ा गटात 582 आणि छोटय़ा मुलांच्या गटात 74 बालसायकलस्वार मिळून एकूण 656 सायकलस्वारांनी सहभाग घेतला होता.
या उपक्रमासाठी जनकल्याण समितीचे परळ विभाग कार्यवाह प्रताप परब यांच्या नेतृत्वाखाली अनिल तोरसकर, सुनील खाडये, सुधीर देवळेकर, चंद्रशेखर परब, अमेय मंडलिक यांच्यासह 150 पुरुष आणि महिला नियामकांनी मोलाची कामगिरी बजावली. या सायकल मॅरेथॉनसाठी महानगरपालिका, वाहतूक पोलीस तसेच विभागीय पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी विशेष मेहनत घेतली.





























































