
सामना प्रतिनिधी। मुंबई
दूरदर्शनचे तब्बल 140 हंगामी कर्मचारी गेल्या 15 दिवसांपासून रस्त्यावर आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलकांना दुरदर्शनमधून कुठल्याही प्रकारचे सहकार्य करण्यात येत नसून त्यांना दूरदर्शनमध्ये पाणी पिण्याची तसेच तेथील शौचालय वापरण्याची, अगदी कॅण्टीनमध्ये जेवण्याची परवानगीही देण्यात आलेली नाही. एका कर्मचाऱयाने त्यांना एका स्टीलच्या टाकीतून पाणी देण्याचा प्रयत्न केला. या कर्मचाऱयाची चौकशी सुरू आहे. विविध मागण्यांसाठी कर्मचाऱयानी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. अत्यंत तुटपुंजा पगार, प्रवास भत्ता नाही, मुलाबाळांची शिक्षणे, आजारपणे काढायची कशी? असा सवालही या कर्मचाऱयांनी केला असून आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत काम बंद लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार या कर्मचाऱयांनी केला आहे. गेल्या 15 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे.
हंगामी कर्मचारी गेल्या 8 ते 23 वर्षांहून अधिक काळ दूरदर्शनमध्ये टेक्निकल स्टाफ, कॅमेरामन, व्हिडीओ एडिटिंग, टायपिस्ट, प्रशासन विभाग, अकाऊंटस् डिपार्टमेंट अशा विभागात काम करतात. तरीही त्यांना प्रवास भत्ता, मेडिक्लेम, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी, बोनस, महिला कर्मचाऱयांना मॅटर्निटी लिव्हही दिली जात नाही. या आंदोलनाची दखल सरकारने घ्यावी, असे निःस्वार्थ कामगार संघटनेच्या अंजली दमानिया यांनी म्हटले.
निवेदने देऊनही उपयोग नाही
कर्मचाऱयांनी दिल्लीपर्यंत जाऊन प्रसार भारतीचे मंत्री, सीईओ, एडीजी यांच्यासोबत बैठका घेतल्या, निवेदने दिली, परंतु केवळ पोकळ आश्वासनांखेरीज पुढे काहीच झाले नाही. वाट पाहून अखेर कर्मचाऱयांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्याचे दमानिया यांनी सांगितले.
त्यांना सुबुद्धी दे रे म्हाराजा…
‘त्यांका सुबुद्धी दे रे म्हाराजा…आमची पोरं गेल्या 15 दिवसांपासून घरदार सोडून इथे आंदोलनाक बसलीत. त्यांच्या संपाक यश येऊ दे रे म्हाराजा…पगारवाढ होऊ दे…आमच्या आंदोलनाक यश मिळू दे रे म्हाराजा’ असे गाऱहाणे कर्मचाऱयांनी घातले.
कामगारांच्या मागण्या
- दिल्लीत झालेल्या बैठकीत आश्वासने दिल्यानुसार 30 जून 2019 पर्यंत धोरणात्मक आराखडा तयार करून हंगामी कर्मचाऱयांना नोकरीत कायम करावे.
- त्यासाठी ठरल्याप्रमाणे कमिटी नेमून काम करण्यात यावे.
- कर्मचाऱयांची पगारवाढ वाढत्या महागाईनुसार करून द्यावी.
- नियमानुसार भत्ते, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी, बोनस, ओव्हर टाइम, सुट्टी देण्यात याव्यात अशी कामगारांची मागणी आहे. सरकारने नोंद घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावेत.


























































