Dhangar Reservation महाधिवक्त्यांसोबत बैठक,उद्धव ठाकरे यांचा पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

राज्यातील धनगर आरक्षणाच्या संदर्भात 23 फेब्रुवारीला ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर राज्याचे महाअधिवक्ता व धनगर समाजाच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीकडे संपूर्ण राज्यातील धनगर समाजाचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी धनगर आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या सर्वपक्षीय नेत्यांची गुरुवारी ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तत्त्वतः मान्य केले आहे असे ‘वर्षा’ बंगल्यावरील बैठकीनंतर धनगर समाजाच्या नेत्यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.

धनगर समाजाला आरक्षण मिळण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. या समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारही सकारात्मक आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत ‘टीस’चा अहवाल प्राप्त झाला असून महाअधिवक्त्यांकडे हा विषय सोपवण्यात आला आहे. महाअधिवक्ता त्यावर कार्यवाही करीत असून निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्र सरकारकडे आरक्षणाबाबत शिफारस करणार असून योग्य मार्ग निघेल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. पुढचे सरकार शिवसेना-भाजप युतीचेच येणार असून धनगर समाजाला दिलेले वचन याच काळात पूर्ण करणार, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात आपण सत्तेत आहोत, आरक्षण दिले पाहिजे अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे उद्धव ठाकरे यांनीही धनगर नेत्यांकडे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर होणाऱया बैठकीबाबत धनगर नेतेही सकारात्मक आहेत.