मुंबई उपनगर जिल्ह्यात आपत्ती रोखण्यासाठीच्या उपायांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

महाराष्ट्र सध्या विविध आपत्तींचा सामना करीत आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे आणि दरड कोसळल्याने आपत्ती ओढवली आहे. ज्या ठिकाणी संरक्षक भिंती असूनही नुकसान झाले, अशा आणि इतर धोकादायक ठिकाणी आयआयटीच्या तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास करून विविध पर्याय सादर करावेत, अशा सूचना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केल्या.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणांचा ठाकरे यांनी आज वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक, सबंधित विभागातील महानगरपालिकेचे सहायक आयुक्त आदी उपस्थित होते.

ठाकरे यांनी पावसामुळे आपत्ती ओढवलेल्या मुंबई उपनगरातील ठिकाणांची मागील आठवड्यात प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर आयोजित या बैठकीत त्यांनी या जागा अतिशय धोकादायक असल्याने जेथे मागणी आणि आवश्यकता आहे तेथे तातडीने संरक्षक भिंत बांधण्याची सूचना केली. तसेच जेथे संरक्षक भिंतींचा उपयोग होणार नाही अशा ठिकाणी तज्ज्ञांमार्फत इतर पर्यायांचा अभ्यास करावा, असे सांगितले. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह महानगरपालिका, एमएमआरडीए, वन विभाग, म्हाडा आदी विभागांनी समन्वयाने काम करावे आणि वस्त्या असलेल्या ठिकाणांना प्राधान्य द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

यावेळी जिल्हाधिकारी बोरीकर आणि महापालिकेच्या सहायक आयुक्तांनी धोकादायक असलेल्या जागा आणि तेथे सुरू असलेल्या कामांबद्दल माहिती दिली.

 

आपली प्रतिक्रिया द्या