बाजारात दिवाळी; ऑनलाइन, ऑफलाइन खरेदीचा उत्साह; पर्यटनाचाही श्रीगणेशा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळी खरेदीचा उत्साह मुंबईतील बाजारांमध्ये ओसंडून वाहत आहे. अर्थचक्र पुन्हा गती घेत आहे. कोरोना संकटात लॉकडाऊन झालेले ग्राहक आता घराबाहेर पडताना दिसत आहेत. ओस पडलेल्या दुकानांमध्ये पुन्हा गर्दी दिसू लागली आहे. दिवाळी साहित्याबरोबरच कपडे, दागिने, भांडी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. फटाक्यांवर मर्यादा असल्या तरी फटाके घेण्यासाठी दुकानांबाहेर रांगा लागत आहेत. एपंदरीत सर्वच प्रकारच्या खरेदीसाठी मुंबईकर बाहेर पडल्याने बाजार फुलून गेले आहेत.

गेले आठ महिने लॉकडाऊनमुळे बाजार थंडावला होता. दिवाळीच्या तोंडावर तो पुन्हा गजबजून गेला आहे. लॉकडाऊननंतर महागाई वाढली असली तरी दिवाळी खरेदीचा उत्साह कमी झालेला नाही. दिवाळी म्हणजे नवीन खरेदीची पर्वणीच. दिवाळीसाठी नवे कपडे खरेदी केले जात आहेत. भाऊबीजेला भेटवस्तू म्हणून कपडे, भांडी खरेदीला प्राधान्य दिले जात आहे.

दादर, मुंबादेवीत भांडी खरेदीसाठी रिघ

दादर तसेच मुंबादेवी व आसपासच्या परिसरात भांडी खरेदीसाठी रिघ लागली आहे. विशेष करून भाऊबीज भेट म्हणून देण्यासाठी भांडय़ांना पसंती दिली जाते. विविध आकाराच्या स्टीलच्या भांडय़ांना, किचन सेट्सना चांगली पसंती मिळत आहे. मुंबादेवीतील व्होलसेल व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात ऑर्डर बुकिंग होत आहे.

कपडे खरेदीला उत्साह

ग्राहकांच्या स्वागतासाठी दादर मार्पेट तसेच हिंदमाता परिसरातील दुकाने झगमगली आहेत. रेडिमेड कपडे घेण्याकडे ग्राहकांचा जास्त कल दिसत आहे. विविध प्रकारच्या साड्या, पंजाबी ड्रेस, शेरवानींना ग्राहकांची पसंत लाभत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्सही दिल्या जात आहेत. मस्जिद बंदर, मंगलदास मार्पेट, काळबादेवी येथील कपडा मार्पेटमधील दुकानदारांनाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

कंदील, दिवे, तोरणांसाठीही गर्दी

दिवाळी म्हणजे पंदील, दिवे, वीजेची तोरणे, डेकोरेशनचे साहित्य आलेच. क्रॉफर्ड मार्पेटमध्ये या साहित्याच्या चांगल्या व्हरायटी मिळतात. लोकलमध्ये सध्या महिलांनाच परवानगी असल्याने तिथे महिलांची अधिक गर्दी दिसून येत आहे. क्रॉफर्ड मार्पेटमध्ये सुकामेवा विक्रीही जोरदार आहे. जवळच्या मोहम्मद अली रोडवरील फटाक्यांच्या दुकानांबाहेरही रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. धारावीच्या कुंभारवाडय़ातही मातीचे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा उत्साह दिसत आहे.

झवेरी बाजार गजबजला

दागिने खरेदीसाठी झवेरी बाजार गजबजला आहे. प्रियजनांना दिवाळी शुभेच्छा देताना सोन्याचांदीच्या वस्तू भेट दिल्या जातात. खास दिवाळीसाठी विशेष डिझाईन्सचे दागिने झवेरी बाजारात उपलब्ध होतात. भाऊबीज तसेच दिवाळी पाडव्यासाठीही सोने खरेदी होते. सोन्याचे दर वाढले असले तरी ग्राहकांचा सोने खरेदीचा उत्साह कमी झालेला नाही.

पर्यटनाच्या बुकिंग जोरात

कोरोनामुळे थबकलेली पर्यटन क्षेत्राची गाडीही दिवाळीच्या काळात चांगलीच रुळावर येण्याची चिन्हे दिसत आहेत. मुलांच्या ऑनलाईन शिकवणीला दिवाळीची सुट्टी मिळाल्याचा मुहूर्त साधत अनेकांनी सहकुटुंब फिरायला जाण्याचे प्लॅनिंग केले आहे. टूर्स अॅण्ड ट्रव्हल्स कंपन्यांमध्ये दिवाळीचे चांगलेच बुकिंग झाले आहे. हॉटेल आणि लॉजवाल्यांनाही यंदाची दिवाळी चांगली जाईल असे दिसत आहे.

दलाल स्ट्रीटवर तेजीचे कंदील

कोरोना लसीची खूशखबर मिळाल्यानंतर शेअर बाजारात दिवाळीचा उत्साह संचारला आहे. बुधवारी सलग आठव्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगलीच तेजी दिसून आली. सेन्सेक्सने 316.02 अंकांनी, तर निफ्टीने 118.05 अंकांनी उसळी घेतली. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत तसेच विदेशी गुंतवणूकदारांचे वाढते प्रमाण यामुळे शेअर बाजारात तेजी परतल्याचे विश्लेषकांचे मत आहे.