मुंबई गुन्हे शाखेच्या ‘लियो’ची कमाल; बेपत्ता झालेल्या मुलाला शोधून काढले

मुंबई गुन्हे शाखेच्या श्वान पथकातील ‘लियो’ या श्वानाने एक उत्तम कामगिरी बजावली आहे. खेळण्यासाठी घराबाहेर गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाला शोधण्यात लियोने चांगली कामगिरी पार पाडली. त्यामुळे तो चिमुकला त्याच्या आईवडिलांकडे सुखरूप परतला आहे.

अंधेरी पूर्वेकडील राहणाऱया कमला (नाव बदललेले) यांचा सहा वर्षांचा मुलगा घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. मात्र बराच वेळ होऊनही तो घरी न परतल्याने कमला व त्यांच्या कुटुंबीयांनी मुलाचा परिसरात शोध घेतला, पण तरी तो मिळून न आल्याने त्यांनी पवई पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी लगेच मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर श्वान पथकालादेखील बोलावण्यात आले. त्यानुसार लियो घटनास्थळी दाखल झाला. त्याला मुलाने दिवसभर घातलेल्या कपडय़ांचा वास देण्यात आला. मुलाने घातलेल्या टी-शर्टचा वास घेतल्यानंतर लियोने त्याचे काम सुरू केले. अखेर लियो अशोक टॉवर परिसरातील आंबेडकर उद्यान येथे जाऊन थांबला. विशेष म्हणजे त्याच ठिकाणी बेपत्ता झालेला सहा वर्षांचा मुलगा सुखरूप मिळून आला. मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून पवई पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.